पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या प्रेमामुळे रुक्मिणीला वाटणारा मत्सर हे विकार माणसाप्रमाणं देवांनाही अशा ओव्या बहाल करतात. आणखी अशाच एका ओवीत वर्णन येतं

तुळशी गं बाई, तुला न्हाई नाक डोळे
अशा सावळ्या रूपाला कसे गोविंद भुलले
मापस तुळशी गं बाई, काय हे तुजं जिणं
गोविंदाच्या संगे वसविर्साला लगीन.

 अशा ओव्या मानवी मनाची देवाशी असणारी आगळी सलगी व्यक्त करतात. देवावर जशी श्रद्धा ठेवतात. तशीच त्याला सखा मानून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न जात्यावरच्या ओवीतून होतो.

 पूर्वी खेडोपाड्यातल्या स्त्रियांना शेतावर जायला लागायचं. तिथला निसर्ग, पेरण्या, कापण्या, बैल या विषयीची भावनाही मग ओवीचा पदर धरून व्यक्त व्हायची

ज्येष्ठ गं महिन्यात  ईज झालीया कावयीरी
बंदु राजाच्या हातात गं  कुरी झालीया नवयीरी
शेताला गेली कुरी   आडवी लागली माजी निरी
ताईता बंदू माज्या   तुमची पिकू द्या शेतसरी
शेताला गेली कुरी  ताशी लावून उबी केली
लाडक्या बाळायानी  बैलबाबाला हाक दिली
शेताला गेली कुरी  बी नेलंया उडीदाचं
माजा ग बाळराज  पेरं पेरीतो मिरगाचं

 मृग नक्षत्रातला पेरणीचा थाट या ओवीतून सामोरी येतो. सासरी गेल्यावरही भाऊ, माहेर स्त्रीच्या मनातून विसरत नाही. तिथल्या आठवणी, त्याचं कुशल चिंतन हे सगळं अशा प्रकारे ती व्यक्त करत राहते. बऱ्याचवेळा जात्यावरची ओवी ही स्त्रीच्या आठवणींचा उत्सव बनते.

 तिला आयुष्यात अनेक नातेबंध सांभाळावे लागतात. सासू, सासरा, नणंद, नवरा, माहेरचा गोतावळा तर वेगळाच. आयुष्यात अनेकवेळा या नातेसंबंधांत तिची घुसमट होते; पण तरी शेवटी प्रसंगी नमतं घेऊन का होईना तिला सगळं सांभाळावं लागतं. आईवडिलांच्या बद्दल तर तिला अपार स्नेह. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी तिला त्यांना दुरावावं लागतं. त्यामुळं ती ओढ आयुष्यभर तिला राहते.

बापाजी समींदर  बया मालन व्हाती गंगा
दोगांच्या सावलीत  कर आंगूळ शिरीरंगा
काशी बनारसी  बनारसीचा डोंगूर

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ३० ॥