पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पानी जाईल भरताराचं
भरतारासंग नारी येळी घ्यावं गं मोडतं
पाणी मोलाला चढतं.
याला भरताराला नारी, नको बोलूस अजंदुजं
आपल्या जलमाच त्येनं उचललं वझं
फाटला पाटव, घे ग निरीला झाकून
आब कंथाचा राखून

 असं सगळं मोठ्यांचं ऐकून सासरी पाऊल पडलेलं असतं. जात्यावर दळण दळताना मनात सगळा आठवणींचा उत्सव चाललेला असतो. थोडक्यात आता सासर हेच तुझं खरं घर आहे. तिथली माणसं ही आता तुझी आहेत. त्यांचा मान राखणं, सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. महत्त्वाचा म्हणजे नवरा, त्याचा शब्द मोडू नको. त्याचं अजं दुजं कोणाजवळ बोलू नकोस. वेळप्रसंग कसेही येतील. पैसा असेल नसेल; पण म्हणून चारचौघाला ते कळू देऊ नको. नवऱ्याची प्रतिष्ठा चारचौघांत जप. कारण तीच तुझीपण प्रतिष्ठा आहे, ही शिकवण तिला सतत दिली जात असे आणि हे सांगताना मग कुठंतरी या घराला तू आता पाहुणी झालीस हेही सांगणं येतं. आई-बाप असतात तोवर सणासुदीला मानपान होईल. हक्कानं जाता येईल.

ज्या गावात मायबाप. त्या गावाच मला याड
सयानू किती सांगू तिथं गारव्याचं झाड

 हा मनातला विसावा, गारवा आईबाप आहेत तोपर्यंत शाबूत राहतो. म्हणून मग ओवी येते

जोवरी माय बाप, लेकी येऊद्या जाऊ द्या
आंब्याची आंबराई, एवढी बाळाला घेऊ द्या
जोवरी मायबाप, लेकी माहेराची हवा
भाऊ भावजयांचं राज्य, मग अम्मल आला नवा

 जोपर्यंत माहेरी आईवडील आहेत, तोवर देणं घेणं होईल. मुराळी पाठवून तुला बोलावणं होईल. जावयाचा मान राखला जाईल. पोरांचं कोडकौतुक होईल. त्यांच्या माघारी मात्र तेवढी ओढ उरणार नाही. भावजयांच्या राज्यात हे सगळं होईल याची खात्री नाही. अशा अर्थाची ओवी जातं ओढताना, गाताना कित्येक बायकांचे डोळे नक्की पाणवत असतील. ज्यांचे आईवडील नाहीत त्यांचा तर हुंदका सुद्धा घशात अडकत असेल.

 जात्यावरच्या अशा ओव्या या एक प्रकारची भावगीतच आहेत, असं सतत जाणवत राहतं. भाव-भावनांचं इतकं वैविध्यीकरण खचितच इतर कुठं दिसून येतं.
लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ २४॥ डॉ. राजेंद्र माने