पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जणू त्यांनी बांधून ठेवलं आहे आणि जिवापाड सांभाळलंही आहे. तरल भावना जपणं, त्या तितक्याच ताकदीने उपमांच्या, रूपकांच्या आधारानं व्यक्त करणं हे जणू स्त्रीच करू जाणे. म्हणूनच काय एका ठिकाणी कवी इंद्रजित भालेरावांनी म्हटलंय

पुरुषापासूनच इतिहासात
कवितेला कायम भीती राहिली होती
म्हणून फक्त जात्याभोवतीच
कविता जिती राहिली होती.

 आणि खरोखरच इतकी वर्षे जात्याच्या आधारानं या ओव्या अजून जिवंत आहेत.

 या जात्यावरच्या ओव्या वाचल्या, ऐकल्या की जाणवतं ही रचना तशी मुक्त आहे. आपसुक ओठातून बाहेर पडलेली ही एक कथाच अहे. कुठंतरी ती स्त्री स्वत:च्या आयुष्यातले प्रसंग त्यातून व्यक्त करते आहे. स्वत:ची सुख दुःख त्यातून हे तिचं तिलाही समजत नाही. त्या स्त्रीला, 'बये!, तू ही ओवी कशी रचलीस?' असा प्रश्न विचारला तर तिला या प्रश्नाचं उत्तर देता येईल का नाही, ही शंकाच आहे. कारण असं काही ठरवून ती ते गात नाही. बहिणाबाईंनी या ओव्या कशा सुचतात हे सांगताना

अरे घरोटा घरोटा
तुह्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं व्होटी

 असं म्हटलंय... हे सगळं प्रकटीकरण इतकं सहज होतं, की तिचं तिलाही कळत नाही; पण या जात्यावरच्या ओव्या या मराठीतलं अनमोल धन आहेत. स्त्री जीवनाचा एक इतिहास त्या सगळ्या ओव्यांत लपून राहिला आहे.

 जात्यावरच्या ओव्यामधलं विषयांचं वैविध्य पाहिलं, की जाणवतं या पाठी स्त्रीची वेदना लपून राहिली आहे. एक दुःख आहे, जगण्यातलं भान आहे.

 पूर्वीच्या काळी मुलींची लवकर लग्न होत. अंगणात भातुकली खेळता खेळता कधी खऱ्या संसाराला सुरवात झाली हे त्यांनाही कळत नसे. आई वडिलांचा भावाबहिणींचा दुरावा त्यांना सासरी गेल्यावर सहन करावा लागे. तिथं नवीन माणसं, नवीन वातावरण या सर्वात मिसळून जाणं तितकं सोपं नसायचं. माहेरातून पाय उचलायचा नाही. आई, बाप, भाऊ सगळी नाती आठवून मन भरून यायचं.

सासरी जाती लेक तिच्या डोळ्यात आलं पाणी
बाप म्हणतो माझी तान्ही

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ २२ ॥