Jump to content

पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्व देते. पाश्चात्त्य संस्कृती पंचेद्रियांची पूजा करते, तर आपली संस्कृती पंचमहाभूतांची उपासना करते. पाश्चात्त्य संस्कृती क्षणाचा विचार करते, तर आपली संस्कृती युगाचा विचार करते. पाश्चात्त्य संस्कृती क्षणिक सुखाला मौलिक मानते; तर आपली संस्कृती चिरस्थायी आनंदाला महत्त्व देते. (सुख व आनंद यात खूप फरक आहे, हेही आपण ओळखले पाहिजे.) पाश्चात्त्य संस्कृती सुखोपभोगांना ओरबाडून घेते; तर आपली संस्कृती सुखांना वाटत जाते. पाश्चात्त्य संस्कृती जीवनाला चवदार बनविते; तर आपली संस्कृती जीवनाला अर्थपूर्ण करीत असते. थोर लेखक श्री. पु. ल. देशपांडे यांच्या शब्दात बोलायचे झाले तर पाश्चात्त्य संस्कृती ही द्राक्षसंस्कृती आहे; तर आपली संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे. दोन संस्कृतीमधील मूलभूत फरक आपण लक्षात घेतला, तर आपणाला आपल्या संस्कृतीची महत्ता जाणवल्याशिवाय राहणार नाही, असे वाटते.

 ही महत्ता दाखवून देण्याचे काम डॉ. राजेंद्र माने यांच्या लोकसंस्कृतीचा गाभारा' यासारख्या माहितीपूर्ण ग्रंथातून उत्तम प्रकारे झालेले आहे. गाभाऱ्यापर्यंत प्रवास केलेल्या त्यांच्या लेखणीने आता ललित साहित्याच्या निर्मितीबरोबरच संस्कृतीच्या कळसाकडेही गेले पाहिजे. कळस मंदिराचा असो वा संस्कृतीचा असो, त्याच्या दर्शनात अपार तृप्ती असते. अपार समाधान असते नि जीवन कृतार्थतेची अपार भावना दाटलेली असते. म्हणून त्याच्या दर्शनासाठी आपण अनावर होऊन जातो. विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी अनावर झालेल्या वारकऱ्याप्रमाणे!

 हे वारकरीपण डॉ. मानेंनी स्वीकारले पाहिजे! शब्दातून व्यक्त केले पाहिजे, असे वाटते! त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

डॉ. द. ता. भोसले