पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैशिष्ट्ये ठळक केली आहेत? किंवा अधोरेखित केली आहेत? किंवा त्यांची लोकसंस्कृतीचे कोणते दर्शन आपणास घडवले आहे? थोडक्यात असे म्हणता येईल, की

 १. आमच्या या संस्कृतीची धर्म आणि देवदेवतांची विधी-उपासना ही एक प्रबळ प्रेरणा आढळते.

 २. आमच्या या संस्कृतीने संसार आणि संन्यास अथवा प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधलेला आहे.

 ३. संसारी माणूसही भक्ती, कुळाचार, उपासना, नामस्मरण, दानधर्म याद्वारे संसारापासून देवत्वापर्यंत जाऊ शकतो.

 ४. आमच्या कला आणि साहित्य, संगीत यांचा उदय मंदिर उपासनेतून झालेला आहे.

 ५. लोकसंस्कृतीत निम्नस्तरीय देवतांचीच अधिक उपासना होत असते.

 ६. श्रमाची उपासना ही या संस्कृतीची पूजा असते. पूजा मानली आहे.

 ७. मनोविनोदन, स्वप्नपूर्तीचा आनंद, सहजीवन यांनाही इथे स्थान आहे.

 ८. इष्ट देवतांचे उपासक आपल्या दैवत श्रद्धेला घट्ट करीत असतात.

 ९. लोकसंस्कृती ही परंपरा प्रिय, नैसर्गिक वृत्तीची आणि श्रद्धेवर जगणारी अशी संस्कृती आहे.

 १०. गीते-गाणी, ओव्या, भारूडे यातून मनोरंजनाबरोबरच भक्तीची भावना दृढ करण्यावर इथे भर दिलेला आढळतो.

 ११. आणि या आपल्या लोकसंस्कृतीत अतिशय अर्थपूर्ण अशा प्रतीकांचा उदंड वापर केलेला जाणवतो (आणि लेखकांनी त्या-त्या लेखातील प्रतीकांचा अर्थ उलगडूनही दाखविला आहे.)

 अशी ही आपली संस्कृती मानवी जीवनाला अंतर्बाह्य फुलविणारी, विकसित करणारी आणि उन्नत बनविणारी असल्याने पाश्चात्य संस्कृतीच्या बहिरंगाला भुलून आपण त्या संस्कृतीची गुलामगिरी स्वीकारणे माणूस, समाज आणि राष्ट्र या तिन्हीच्या दृष्टीने आत्मघातकी ठरते. कारण धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, साहित्य, कला, परंपरा आणि इतिहास यांच्यातून साकार होणारी संस्कृतीच अस्मिता आणि आत्मभान देत असते. अस्मितासंपन्न राष्ट्रच अरिष्टाचा पराभव करू शकते. गुलामगिरी अव्हेरत असते आणि गुलामगिरी अव्हेरणारा माणूसच 'माणूस' म्हणून ताठ मानेनं जगू शकतो. ज्याची संस्कृती पराभूत झालेली नसते; तो जगालासुद्धा पराभूत करू शकतो. पण केव्हा? परकीय संस्कृतीला आंधळे अलिंगन देण्याचे आपण टाळले तर. कारण रसरशीत व देखण्या असलेल्या दाईपेक्षा सामान्य रूपाची सेवाभावी आई केव्हाही श्रेष्ठ मानावी लागेल. या दोन्ही संस्कृतीमध्ये तुलना केली तर आपणाला काय दिसते? थोडक्यात असे उत्तर देता येईल, की पाश्चात्य संस्कृती शरीरसुखाला अधिक महत्त्व देते, तर आपली संस्कृती आत्मिक सुखाला अधिक