पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

प्रस्तावना  विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी केलेली कल्पनातीत आणि आश्चर्यकारक प्रगती आणि जागतिकीकरण, खाजगीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्था यामुळे सारे जग आता एका गावाप्रमाणे झालेले आहे. जगातली सारी राष्ट्रे परस्परांच्या जवळ आलेली आहेत. त्यातूनच विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये व्यवहार, व्यापार आणि अन्य क्षेत्रातील आदान-प्रदान यांना गती प्राप्त झालेली असली, तरी विषमतेची दरीही झपाट्याने वाढत चाललेली आहे. एकीकडे जगामध्ये दररोज तीनशे अब्ज डॉलर म्हणजे बारा हजार अब्ज रुपये युद्धसाहित्यावर खर्च केले जातात, तर दुसरीकडे आफ्रिका आणि आशिया खंडातील अतिशय गरीब देशांतील तीन हजार बालके अन्नावाचून मृत्युमुखी पावतात. भारतातल्या चौदा लोकांना जेवढी विजेची गरज असते, तेवढी वीज अमेरिकेतील नागरिक दररोज वापरत असतो. सारांश इतकाच, की राजकारण, अर्थकारण, तंत्रज्ञान आणि प्रगत उद्योगधंदे यांच्यातून आलेल्या शक्तीतून एक दुसऱ्या प्रकारची गुलामगिरी जगातली प्रगत आणि श्रीमंत राष्ट्रे या मागासलेल्या राष्ट्रांवर लादत आहेत. आर्थिक गुलामगिरी आणि औद्योगिक दास्य हे कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करीत असते. वेगळ्या स्वरूपात ते इतर राष्ट्रांवर अधिराज गाजवित असतात. त्यातूनच मग युद्धाचा आगडोंब उसळण्यास निमित्त मिळत असते. तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण होत असते.

 जगातले काही विचारवंत असे भाकीत करीत असतात, की उद्या कदाचित तिसरे महायुद्ध झालेच तर ते तीन कारणांमुळे होऊ शकेल. एक पाण्यावरून तरी महायुद्ध घडेल, पेट्रोलवरून तरी ते होऊ शकेल किंवा संस्कृतीच्या स्वामित्वावरून तरी ते घडू शकेल. ही तीनही कारणे आजच्या घडीला जगासमोरचे तीन ज्वलंत प्रश्न असले, तरी त्यातूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे सागराच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यामध्ये संशोधकांना यश आलेले आहे. उद्या ते अतिशय कमी खर्चात सर्वांना उपलब्ध होऊ शकेल. तीच गोष्ट पेट्रोलची म्हणता येईल. पाणी, सूर्यप्रकाश, वारा आणि वनस्पती यांच्या आधारे पर्यायी ऊर्जा निर्माण करण्यात फार मोठी प्रगती झालेली आहे आणि होतही आहे. त्यामुळे काही काळाने पेट्रोलचे साठे कमी झाले वा संपुष्टात आले, तरी मानवजातीजवळ पर्यायी ऊर्जास्त्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला असेल. त्यामुळे वरील दोन कारणे तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत होतील असे वाटत नाही. मात्र, जगातल्या देशांवर कोणत्या आणि कुणाच्या संस्कृतीचे स्वामित्व असावे, यावरून महायुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच एक भाग म्हणून आज ख्रिस्त धर्म आणि इस्लाम यांच्यामध्ये