पान:लाट.pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्विकारपणे तिने ते ऐकून घेतले.
 "त्याने तुला बोलावले आहे. एकदा जा. त्याला भेटून ये. कधी जातेस? मी बरोबर येईन तुझ्या-"
 "कशाला बोलावले आहे?" तिने मान वर करून म्हटले, "आता भेटून काय उपयोग? माझ्या आयुष्याची त्यांनी केव्हाच राखरांगोळी केली. आता काय इरादा आहे?"
 "असे काय बोलतेस? तो नवरा आहे तुझा! त्याची तुझ्यावर-"
 "काही नाही. माझ्यावर त्यांचा लोभ नाही. प्रेमाने मला एकदाही हाक मारली नाही. सुख असे माझ्या वाट्याला केव्हा आले नाही. त्यांनी माझ्या आशा, आकांक्षा चिरडून टाकल्या. माझे मन मारून टाकले. आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल जरासुद्धा मोहब्बत उरलेली नाही. मला त्यांची नफरत वाटते, नफरत!"
 उबेदुल्ला गप्प राहिला. तिला अधिक आग्रह करायला त्याला शब्द सुचले नाहीत. मुकाट्याने तो खोलीबाहेर पडला.


 काही दिवसांनी तिचा बाप तिला न्यायला आला. बापाबरोबर ती जायला निघाली. तेव्हा उबेदुल्ला तिला अडवू शकला नाही. त्याने असहायपणे तिला जायची संमती दिली. ती निघताना सासू-सासऱ्यांच्या पाया पडली. मग सासऱ्याला आपल्या खोलीत एकांतात बोलावून तिने आपले दागिने त्यांच्या हवाली केले.
 “हे तुमच्याजवळ असू द्या. माझे म्हणून ते मी तुम्हाला देत आहे. माझ्या हातून तुमची सेवा झाली नाही. तुम्ही माझे भले करू शकला नाहीत. पण त्याला तुमचा आणि माझा इलाज नाही. माझ्या किस्मतीत जे होते ते झाले. त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही. मी आता जात आहे. माझ्यावर नाराज होऊ नका. खुषीनं मला निरोप द्या. खुदा हाफिज!" तिने खाली वाकून सासऱ्याच्या पायाला स्पर्श केला.
 "खुदा हाफिज-खुदा हाफिज!" उबेदुल्ला थरथरत कसा तरी पुटपुटला. लटपटत तिथून बाहेर पडला.
 ती गेली आणि घरातले उरलेसुरले चैतन्यही निघून गेले. दोघे नवराबायको तासनतास एकमेकांशी शब्दही न बोलता बाहेर बसलेली राहू लागली. नेहमीसारखे संध्याकाळच्या वेळी गार वारे वाहू लागल्यावर खोकल्याची आलेली उबळ बानो आतल्या आत दाबू लागली. गुडगुडीत तंबाखू नसल्याचे माहीत असूनही उबेदुल्ला ती ओढण्यात दंग राहू लागला. त्यांना सतत सान्निध्यात राहावेसे वाटू लागले, त्याचबरोबर एकमेकांशी काही बोलायचीही भीती वाटू लागली. घरातल्या एकदोन नोकरांचे पगार थकताच तेही निघून गेले. बानो रखडत घरातली कामे करू लागली आणि उबेदुल्ला रांगत तिला मदत करू लागला. मधूनमधून मुलाच्या आठवणींनी व्याकुळ झाला की, शहरात जाऊन त्याला भेटून येऊ लागला.

 एकदा असाच मुलाला भेटून तो संध्याकाळचा शहरातून परतला. रस्त्याने चालू लागला.

९० । लाट