पान:लाट.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिकाऱ्याला त्याची दया आली. त्याने भेटीची व्यवस्था केली. त्या अधिकाऱ्याने सांगितलेल्या जागी तो सद्रुद्दीनची वाट बघत बसला.
 सद्रुद्दीन समोर येऊन उभा राहिलेला पाहताच त्याची गाळण उडाली. सद्द्दीनला त्याने चटकन ओळखले नाही. त्याची प्रकृती अधिकच खालावली होती. त्याचे डोळे खोल गेले होते. चेहरा भकास झाला होता. गालाची हाडे बाहेर निघाली होती. त्याने बापाकडे पाहिले आणि मान खाली घातली.
 "कसा आहेस?"
 "बरा आहे-बरा आहे. तुम्ही कशाला आलात इतक्या लांब?"
 "तुला बघायला-तुला बघायला आलो माझ्या जिवा! काय झालेय हे तुझे? मी पहिल्यापासून सांगत होतो. अखेर तेच झाले ना? दिल्ली सल्तनत आहे तिथंच आहे."
 "आमचे चुकले. थोडेसे चुकले-नाही तर-नाही तर-"
 "नाही तर काय? वेडा! तू वेडा आहेस! मलाही प्रथम तुझ्यासारखेच वाटले, पण त्यात अर्थ नव्हता! आता हे बदलणार नाही. कधीच बदलणार नाही. नाहक आपण आपली सत्यानाशी करून घेतली."
 सद्रुद्दीनने अधिक युक्तिवाद केला नाही. त्याने विचारले, “आई कशी आहे?"
 "आहे. बरी आहे. तुझ्या काळजीने रात्रंदिवस खंगत चालली आहे. काय सांगू तिला? कधी सुटशील म्हणून सांगू?"
 "सुटण्याची सध्या काही आशा नाही."
 "माफी माग-म्हणावं, मला माफ करा. मी चुकून या बाबतीत सापडलो. कम्युनिस्टांनी मला त्यात ओढलं. माझा काही अपराध नाही. मी काही गुन्हा केलेला नाही. हवं तर तसं लिहून देतो तुम्हाला!"
 "त्याचा काही उपयोग नाही. सारं शांत झाल्याशिवाय आमची सुटका होणार नाही." वेळ संपल्याची शिपायाने वर्दी दिली, तेव्हा उबेदुल्ला मागे वळला. तेवढ्यात सद्रुद्दीनने त्याला हाक मारली, "अब्बाजान!"
 "काय?" उबेदुल्ला परत फिरला.
 सद्रुद्दीनचा कंठ दाटून आला. तो पुटपुटला, "ती कशी आहे?"
 "ती-ती होय? आहे, आमच्यासारखीच तुझ्या काळजीत बसली आहे. तिने दागिना मोडला तेव्हा माझे येणे झाले!"
 "माझी तिला सलाम सांगा! मी बोलावलं आहे म्हणून सांगा!"
 "सांगतो-सांगतो."उबेदुल्लाने डोळे पुसत तिथून पाय काढला. बाहेर पडून तो घराकडे यायला निघाला.

 संध्याकाळचा तो घरी पोहोचला तेव्हा बानो बाहेर अंगणात उभी राहून त्याची वाट बघत होती. तो अंगणातच उभा राहिला. धापा टाकीत त्याने तिला मुलाचे वृत्त कथन केले. मग धावपळीने तो घरात गेला. सुनेजवळ जाऊन त्यानं तेच पुन्हा तिला ऐकवलं. विलक्षण

खुदा हाफिज । ८९