पान:लाट.pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिरले. तिथल्या सामानाची, कागदपत्रांची, भिंतीवरच्या छायाचित्रांची त्यांनी उलथापालथ केली. काही कागदपत्रे आणि छायाचित्रे जप्त केली. रात्र होताच त्यांनी घराभोवतालचे पोलीस काढून घेतले आणि त्याच्या खोलीतच ते दबा धरून बसले.
 सद्रुद्दीनची बायको धडधडत्या अंत:करणाने त्यांच्याकडे बघत होती. एकदोनदा त्यांनी तिला खोलीतून बाहेर जायला सांगितले. पण ती जागची हलली नाही. आपला नवरा रात्री केव्हा तरी येईल. नेहमीसारखा दरवाजावर थाप मारील आणि अनायासे पोलिसांच्या सापळ्यात सापडेल हे तिला उमगले. तो येताच आपण चटकन जाऊ, त्याला सावध करू त्यामुळं तरी तो आपल्याशी चांगला वागू लागेल.
 पण पहाटे जेव्हा त्याने दरवाजावर थाप मारली, तेव्हा पोलिसांनी तिला मध्येच अडवले. दरवाजा उघडताच रिव्हॉल्व्हरच्या नळ्या आपल्यावर रोखलेल्या सद्रुद्दीनला दिसल्या. हतबुद्ध होऊन तो पोलिसांच्या स्वाधीन झाला.
 त्याला पोलिसांनी नेले आणि उबेदुल्ला, बानो दु:खाच्या भाराखाली वाकल्यासारखी त्याच्या खोलीत आली.
 “आता मी काय करू? कशी जगू? माझी दोन्ही पोरं गेली. तुम्ही जाऊ दिलीत!" बानो दु:खात सुरात ओरडली. उबेदुल्लाची आधीच वाकलेली मान अधिक वाकून गेली. त्याच्या पायांचे बळ गेले. झालेला प्रकार आता कुठे त्याच्या पुरता लक्षात आला. असहायपणे, अपराधी नजरेने त्याने बायकोकडे पाहिले. मुलाची सुटका करण्याच्या तरतुदीला त्याचे मन लागले.
 पण तेही त्याला शक्य झाले नाही. सद्रुद्दीनला सुरक्षा कायद्याखाली पकडण्यात आले होते. त्याच्यावर खटला भरण्यात येणार नव्हता. त्याला जामिनावर सोडण्यात येणार नव्हते. बेमुदत तो कैदेत राहणार होता.
 दु:खाच्या भाराने उबेदुल्ला पिचून गेला. त्याला पोक आले. गुडगुडी हातात घेऊन ती न ओढताच तासनतास तो वेड्यासारखा कुठेतरी बघत आपल्या आसनावर बसू लागला. मुलाकड़े त्याचे मन ओढ घेऊ लागले. त्याला भेटायला तो अधीर झाला. त्याने शहरात जायचा बेत केला.
 त्याच्यापाशी आता पैसेही उरले नव्हते. होते-नव्हते ते एव्हाना निकालात निघाले होते. बानोजवळही काही उरले नव्हते. त्याने सुनेजवळ जाऊन पैसे मागितले. त्याची लाचार मुद्रा बघून ती आपले दु:ख विसरली. तिचे डोळे भरून आले. आपल्या गळ्यातील दागिना तिने सासऱ्याच्या हवाली केला.


 रखडत रखडत उबेदुल्ला संध्याकाळचा शहरात जाऊन पोहोचला. रात्रभर कुठेतरी राहिला आणि दुसऱ्या दिवशी मुलाला भेटायला तुरुंगात गेला. तुरुंगात त्याची प्रथम कुणी दखलच घेतली नाही. 'माझा मुलगा कुठं आहे? कुठं आहे माझा मुलगा?' असे वेड्यासारखे ती ज्याला त्याला विचारू लागला. पोलिसाने वेडा समजून त्याला बाहेर काढले. अखेर एका

८८ । लाट