पान:लाट.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दर्शनसुद्धा कुणाला झाले नाही. आपल्या खोलीत झोपून राहत तिने बरेच दिवस काढले. मग केव्हा तरी ती आपल्या खोलीतून बाहेर पडू लागली. संध्याकाळच्या वेळी त्या अवाढव्य, ओसाड घराच्या पाठीमागे ती एकटीच जाऊन उभी राहू लागली. तिचा चेहरा ओढगस्त दिसू लागला. तिची प्रसन्नता लोप पावली. तजेला नाहीसा झाला. आणि एक दिवस तिने सासूच्या कानांवर आपले दु:ख घातले.
 "ते रात्ररात्र कुठं बाहेर असतात. कधीकधी दोनदोन दिवस त्यांचा पत्ता नसतो. विचारलं की रागावतात. माझ्यापाशी धड बोलतसुद्धा नाहीत!"
 बानोने विचारले, "केव्हापासून हे असे चालले आहे?"
 "मी या घरात आल्यापासून पाहते आहे. त्यांचे कशात लक्ष नाही."
 "त्याला तू बोललीस?"
 "बोलले–अनेकदा बोलले. नेहमी बोलते. ते ऐकत नाहीत. त्यांची सारी कामे मी करते आहे. रात्री-बेरात्री दार उघडून त्यांना आत घेते आहे. त्यांच्या भोवताली सारखी वावरते आहे. पण त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीवही नाही. मी असून नसल्यासारखीच आहे.”
 "तो जातो तरी कुठं? करतो काय?"
 “कुणाला माहीत? काही सांगत नाहीत. विचारलं की संतापतात. म्हणतात उगाच चांभारचौकश्या करू नकोस! निमूटपणे सांगेन ते काम कर!"
 "बरं. तू काळजी करू नकोस. उगाच जिवाला घोर लावून घेऊ नकोस. मी यांना सांगते. सारे ठीक करते."
 बानोने नवऱ्याच्या कानावर या गोष्टी घातल्या. नवरा-बायकोनी चिंताग्रस्त होऊन आपसांत विचार केला. उबेदुल्ला त्या दिवशी पहिल्या प्रथम हादरला. तो जागचा उठून मुलाच्या खोलीत गेला. सून तेव्हा पलंगावर झोपली होती. त्याला पाहताच ती उठून एका कोपऱ्यात जाऊन पाठमोरी उभी राहिली. उबेदुल्लाने खोलीभर नजर टाकली. मुलाच्या खोलीत केवढा तरी फरक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पूर्वीचा भपका तिथे राहिला नव्हता. भिंतीवरले रंग उडून गेले होते. छताला लटकलेल्या हंड्या आणि झुंबरे काढली गेली होती. फर्निचर नाहीसे झाले होते. आणि भिंतीवर एकदोन नवीनच साधी छायाचित्रे लटकली होती. त्याने बराच वेळ त्या छायाचित्रांकडे निरखून पाहिले. परंतु त्यांची त्याला ओळख पटेना. त्याने बाहेर पडताना सुनेला सांगितले, "तो आला की त्याला माझ्याकडे पाठव.”
 परंतु जेव्हा सद्रुद्दीन त्याच्यापुढे येऊन उभा राहिला तेव्हा त्याला काय विचारायचे, हे उबेदुल्लाला समजेना. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. त्याने सद्रुद्दीनवर नजर टाकली.
 सद्रुद्दीनची प्रकृती पहिल्यासारखी राहिली नव्हती. त्याचे फुगीर गाल आत गेले होते. शरीर कल्पनातीत वाळले होते. केस निबरट झाले होते. पूर्वीचा त्याचा तजेला नाहीसा झाला होता आणि गोरा चेहरा काळवंडला होता.
 "कुठल्या कामात एवढा गुंतला आहेस?" उबेदुल्लाने गुडगुडी खाली ठेवली.

८४ । लाट