पान:लाट.pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्यासमोर बोलावले. बानो होतीच. तो मुलाला म्हणाला, "तुझी शादी उरकायचा आमचा इरादा आहे.”
 "शादी? माझी शादी?" त्याने आश्चर्याने विचारले.
 "होय. का? शादी करायची नाही?"
 "करायची ना! पण इतक्यात कशाला? धांदल काय आहे? सध्याच्या या दुर्दशेत-"
 "दुर्दशा नेहमीचीच आहे! म्हणून काय शादी करायची नाही? शादी लांबणीवर टाकण्याने काय आपली दुर्दशा टळणार आहे? पुढे माझ्याने तुझे भले होईलसेही मला वाटत नाही."
 “सद्रुद्दीन, बहस करू नको. आमची आरजू पुरी कर. आपले पहिल्यासारखे असते तर केव्हाच तुझी शादी उरकली असती!"
 आईबापांना दुखवणे त्याला शक्य झाले नाही. त्यांच्या इच्छेपुढे त्याने मान तुकवली. धीमी पावले टाकीत तो आपल्या खोलीत गेला आणि नवरा-बायको लग्नाच्या गोष्टी बोलण्यात दंग झाली.


 चारपाच दिवसांनी उबेदुल्ला जवळच्या शहरात गेला आणि दोन दिवसांनी परत आला. तिथल्या कोणा नबाब घराण्यातली मुलगी त्याने बघितली. सगाई केली. ती नक्की केली. थोडीशी जमीन विकून पैसा उभारण्याचा बेतही त्याने केला. मुलाने ते ऐकून कडवटपणे हसून म्हटले, "ठीक आहे. एके काळी निझामाला छोकरी अर्पण करून आपण जमीन मिळवली. आता घरात मुलगी आणण्यासाठी तीच जमीन विकायची पाळी आपल्यावर आली आहे."
 बानोने संतापून त्याच्याकडे पाहिले. “तू हे काय बोललास? असल्या बेहिदायत गोष्टी तू कधीपासून करायला लागलास?"
 "मला कळले तेव्हापासून. अब्बाजान, हे खरे आहे ना?"
 "खरे आणि खोटे. तुला काय करायचे आहे? या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेली. हैदराबादमधल्या सगळ्याच नबाबांची ही कहाणी आहे. आम्हीच तेवढे काही वाईट केलेले नाही!"
 "पण याला या पंचायती कशाला?" बानोने त्याच्यावर डोळे वटारले. तो जड पावले टाकीत तिथून बाजूला झाला.
 थोड्याच दिवसांत त्याच्या लग्नाचा सोहळा पार पडला. थोडक्यात आणि कसलाही डामडौल न करता. शहरातली मुलीकडची आणि उबेदुल्लाच्या नात्यातली माणसे काही दिवस त्यांच्याकडे येऊन राहिली. पंधरा दिवसांनी ती सारी परत गेली. काही दिवस गजबजलेले हे घर पुन्हा पूर्ववत शांत, ओसाड वाटू लागले.


 सद्रुद्दीनची बायको बानोसारखीच देखणी आणि गोरी होती. पंडुरोग्यासारखी त्वचा आणि पुष्ट शरीर हा नबाबी घराण्यातला वारसा तिच्याही वाट्याला आला होता. काही दिवस तिचे

खुदा हाफिज । ८३