पान:लाट.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "तेच चालले आहे. जेवायचे तरी कसे? कुठल्या आधारावर? सारे हळूहळू जात चालले आहे. उद्या यातले काहीच उरणार नाही."
 "उद्याचे उद्या बघू. तुला कशाला काळजी हवी? आम्ही आहोत अजून! आम्ही बघू. तू स्वस्थ राहा. घरात पडून राहा. तुम्ही याला नीट समजावून सांगा. तो अजून अनजान आहे. काही कळत नाही त्याला! नसता अनर्थ करील.”
 "त्याची काळजी नको. आता तो इथेच राहणार आहे. यापुढे हैदराबादला जाण्याचे कारण नाही. काय मिळेल ते खायचे, नाहीपेक्षा उपाशी राहायचे. याखेरीज तिसरा मार्ग नाही."
 सद्रुद्दीनने आईबापांचे म्हणणे मुकाट्याने ऐकून घेतले; काही वेळ तो मान खाली घालून उभा राहिला. मग सावकाश चालत आपल्या खोलीत निघून गेला. बानो नवऱ्याजवळ बसून राहिली.
 ती सहसा आपल्या खोलीतून बाहेर पडत नसे. तिचे आता वय झाले होते. शिवाय थोरल्या मुलाच्या मृत्यूने ती खचल्यासारखी झाली होती. मात्र तिचा तजेला कायम होता. सतत घरात वावरल्याने तिची त्वचा वाजवीपेक्षा जास्त गोरी झाली होती. पंडुरोगी माणसासारखी! देह मात्र धष्टपुष्ट होता. तिच्या चालण्यात, वागण्यात आणि बोलण्यात जन्मजात ऐदीपणाच्या खुणा सहज उमटत होत्या.
 ती बसून राहिलेली बघताच उबेदुल्लाने गुडगुडीला हात घालीत म्हटले, “कशाला बाहेर येऊन बसली आहेस? जा, आत जा. पडून राहा!' पण ती काही न बोलता तशीच बसून राहिली. काही वेळाने गार वारे वाहू लागले. हवेत गारठा आला. तिला खोकल्याची किंचित उबळ आली. जागची उठून ती झपाझप पावले टाकीत आपल्या खोलीत गेली. उबेदुल्ला तिथेच गुडगुडी ओढीत बसला.


 हैद्राबादच्या वाऱ्या बंद झाल्यापासून सद्रुद्दीनला घरात बसण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. दिवसभर तो आपल्या खोलीत बसून राहू लागला. सतत काहीतरी वाचू लागला. हातात काहीच सापडले नाही की शून्यपणे विचार करीत बसलेला राहू लागला. आरामखुर्ची तो अशा वेळी खिडकीपाशी घेई आणि बाहेर बघत राही. क्षितिजापर्यंत पसरलेली काळीभोर, अफाट जमीन तिथून त्याच्या दृष्टीस पडे. मधूनमधून खुरटी उगवलेली झुडपे आणि पुंजक्यापुंजक्यांनी वसलेली घरे यांचे त्याला दर्शन होत राही; पण एकदा घरात बसून राहायचा त्याला कंटाळा आला. तो आरामखुर्चीवरून उठला आणि नेहमी लांबून दिसणाऱ्या त्या सपाट, अफाट जमिनीवरून चालू लागला. मागाहून नेहमी जाऊ लागला.

 त्या वर्षी फार कमी महसूल उबेदुल्लाच्या घरात येऊन पडला. नवरा-बायकोनी एकमेकांशी सल्लामसलत केली. मग घरातले काही नोकर कमी केले. खर्चात अधिक काटकसर केली आणि कसेबसे ती भागवू लागली. बानोने एक दिवस सद्रुद्दीनच्या लग्नाचा विषय नवऱ्यापाशी काढला. लग्न उरकून टाकावेसे त्यालाही वाटू लागले. त्याने मुलाला

८२ । लाट