पान:लाट.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

छप्पर

 जवळ जवळ चार वर्षांनी आपले शिक्षण संपवून अबासखानाचा मुलगा करीम जेव्हा घरी गेला, तेव्हा घराच्या छपराशीच थांबून, कपाळाला आठ्या घालीत आपल्या बापाला म्हणाला, "काय हा काळोख आपल्या घरात? धड चालायलासुद्धा जमत नाही!"
 अबासखानाने मुलाचे आपादमस्तक निरीक्षण केले. वीस वर्षे या घरात वावरलेल्या माणसाला चालायला न जमायला काय झाले? तो मुलाला हसत हसत म्हणाला, "मुंबईच्या लायटातून आल्यावर असंच वाटतं माणसाला. मी जेव्हा पहिल्यांदा घरी आलो..." आणि त्याने नेहमीप्रमाणे आपल्या भाकडकथा तिथल्या तिथे मुलाला सांगायला सुरुवात केली. पण करीम तेथे थांबला नाही. त्याची बाळंतपणासाठी आलेली बहीण आजारी पडली होती. बापाला तिथेच बोलत ठेवून तो काळोखातून ठेचा खात बहिणीच्या खोलीत गेला आणि खाटेवर झोपलेल्या बहिणीला पाहून आश्चर्याने म्हणाला, “तू अशी पांढरी फटफटीत का पडली आहेस?"
 ती निस्तेजपणे हसली. बाजूला तिच्या कुशीत तिचे मूल शांतपणे झोपी गेले होते, त्याला ती हळूच थोपटू लागली.
 "तुला होतं आहे तरी काय?" त्याने पुन्हा संशयाच्या स्वरात विचारले.
 या वेळी मात्र त्याच्या पाठोपाठ खोलीत आलेल्या त्याच्या आईने उत्तर दिले, "तिला काहीसुद्धा झालेलं नाही."
 "नाही काय? मी उद्या डॉक्टरकडून तपासणी करून घेतो."
 "बरं घे. पण आता हातपाय धुवायला चल."
 तिथून तो घरात गेला. पण त्याचे मन मात्र शांत झाले नाही. बहिणीची पाहिल्यापासून त्याला एक चमत्कारिक शंका येऊ लागली. दुसऱ्या दिवशी आई-बाप 'नको नको' म्हणत असताना त्याने अट्टहासाने डॉक्टरला आणले आणि तिला तपासून घेतले. तिचा पाहिल्यापासून जो संशय त्याला येत होता, तो खरा ठरला! तिला क्षय झाला होता!

 घरातल्या माणसांना हे ऐकून धक्का बसला. ती बरेच दिवस आजारी होती. परंतु तिचे दुखणे किरकोळ असेल, असे त्यांना वाटत होते. त्या दिवशी घरातले वातावरण पार बदलून गेले. अबासखान, त्याची बायको आणि धाकटी मुलगी अशी तिघेही खिन्न होऊन स्वस्थ