पान:लाट.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला सांगितले, “पुरे कर! कशाला खेपा मारायच्या उगाच! पूर्वीचे हैदराबाद आता राहिले नाही, पूर्वीची सल्तनत आता उरली नाही. आपले काहीच शिल्लक राहिलेले नाही."
 बापाचे म्हणणे सद्रुद्दीनला पटले. “तुम्ही म्हणता ते खरे आहे. पूर्वीचे हैदराबाद आता राहिलेले नाही. आमचे नामोनिशाण शिल्लक ठेवायचे नाही, असा या सल्तनतने चंग बांधला आहे. आमची कौम, आमची जबान, आमचे कल्चर-सारे कसे भराभर उद्ध्वस्त होत आहे. जाणूनबुजून केले जात आहे. पूर्वीसारखे आता एकमेकांचा निरोप घेताना कोणी 'खुदा हाफिज'देखील म्हणत नाही."
 "मग काय म्हणतात?"
 "नमस्ते! नमस्ते म्हणतात!"
 “काय करायचे! आपली सद्दी आता संपली आहे. आता कधी काळी खुदाची मर्जी होईल तेव्हा खरी! तोपर्यंत आपल्याला हे असे डुकराचे जिणे जगावे लागणार! त्याला काहीच इलाज नाही!"
 "काही इलाज नाही!-का? भांडले पाहिजे, आमच्या हक्कांसाठी झगडले पाहिजे. याचा मुकाबला केला पाहिजे.”
 "मुकाबला?" उबेदुल्लाने आपली गुडगुडी खाली ठेवली. त्याचे हात कापू लागले. चेहऱ्यावर आडव्या-उभ्या रेषा उमटल्या. डोळ्यांत कटुता चमकू लागली. सद्रुद्दीनकडे भेदरलेल्या नजरेने पाहत तो म्हणाला, “याचा मुकाबला होणार नाही. याला रोकणारे कोणी नाही."
 "आहे! आम्ही आहोत! आम्ही रोकू! मी रोकीन!"
 "हं! एकदा तसे झाले! तेव्हा काय झाले तुला माहीत नाही? आमचे शेकडो नौजवान त्यांच्या रणगाड्याखाली चिरडले गेले. माझा रहीम त्यात होता. रणगाड्यांसमोर आडवा पडला होता. त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवीत दिल्लीचे रणगाडे पुढे निघाले."
 उबेदुल्लाची बायको त्या क्षणी थरथरत आपल्या पडदानशीन खोलीतून बाहेर आली. बापलेकांचे संभाषण तिला ऐकू येत नव्हते. मुलाच्या उल्लेखानं तिला आत बसणे अशक्य झाले. ओझ्याने वाकल्यासारखी धापा टाकीत नवऱ्यासमोर ती आली आणि भारावलेल्या कंठाने म्हणाली, "कुणी काढले त्याचे नाव?"
 "माझ्या तोंडातून निघाले."
 "कशाकरता? का मला उगाच आठवण दिलीत?"
 घळघळ रडत ती तिथल्या आसनावर बसली.
 "या सद्रुद्दीनला मी समजावीत होतो. तो वेड्यासारखा काहीतरी बडबडत होता. मुकाबल्याच्या गोष्टी मला सांगत होता!"

 "मुकाबला? कसला मुकाबला? झाला तेवढा सत्यानाश कमी झाला? आणखीन करायचा आहे? काय आहे तुझ्या मनात? आपल्याला या गोष्टींशी काय करायचे आहे? दोन वेळचे जेवण मिळेल की नाही याची फिकीर करू या.” .

खुदा हाफिज । ८१