पान:लाट.pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याने त्याला निवेदन केली. डॉक्टरला त्याने ती केस हातात घ्यायला कसेतरी प्रवृत्त केले. तो खोलीत शिरला आणि इसाकची सासू बाहेर पडली.
 सुमारे तासाभराच्या अवधीत सारे बिनबोभाट पार पडले. खिशात पैसे टाकून डॉक्टर पहाटेच्या अंधारात शहरात पसार झाला! मग ते सारे हळूहळू उठले आणि खतीजाच्या आईला दोन धीराचे शब्द सांगून बाहेर पडले. आपापल्या घरी जाऊन आडवे झाले.
 त्यानंतर दोनतीन दिवस लागोपाठ जमून त्यांनी खर्चाचा हिशेब केला. आणि त्यांनी तो आपल्या अंगावर सारखा घेतला. मनातल्या मनात चरफडत, दिलावरला शिव्या घालीत त्यांनी ते पैसे इसाकच्या स्वाधीन केले. तो हिशेब आटोपल्यानंतर मग त्यांना त्या घटनेवर विनोद सुचू लागला आणि खतीजाच्या विव्हळण्यावर ते बोलू लागले. त्या साऱ्याच घटनेवर काही काळ बोलत राहिले. काही दिवसांनी बोलायचे बंद झाले!
 परंतु कशी कुणास ठाऊक, ती बातमी साऱ्या गावात सावकाश पसरत गेली आणि आश्चर्य असे की, त्या संदर्भात दिलावरचे नाव घेतले जाऊ लागले. त्या लोकांच्या कानापर्यंत ही बातमी जाऊन थडकली, तेव्हा ते थक्क होऊन गेले. असे कसे होईल? त्यांना ते खरे वाटेना!
 त्यांनी एके रात्री सहज दिलावरला म्हटले, "गावात लोक काय म्हणतात तुला माहीत आहे काय?"
 "काय म्हणतात?"
 "लोक तुझे नाव घेतात. आणि तुला मदत आम्ही केली असे म्हणून आम्हासही दोष देतात!"
 "मग काय झाले? लोक म्हणतात ते खरेच आहे!" त्याने अत्यंत थंड सुरात उत्तर दिले. "खरे आहे?" त्या साऱ्यांनी ओरडून त्याला विचारले. त्यांना आता तर पराकाष्ठेचा धक्का बसला होता.
 "अलबत! खरेच आहे."
 ह्या उत्तराने ते लोक मूढ बनून गेले. मग त्यांना त्याचा विलक्षण संताप आला. त्याच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. आपल्याला फसवल्याबद्दल तीव्र चीड त्यांच्या मनात निर्माण झाली.
 "असे होते तर तू आम्हाला त्यात कशाला ओढलेस? आमची मान कशाला अडकवलीस?" त्यांनी बेभानपणे त्याला विचारले.
 “माझी मान अडकू नये म्हणून!"
 "असे? आणि आता अब्रू गेली ती?"
 "ती जाऊ दे रे! या गावात साला अब्रूदार आहेच कोण? त्याला मी डरत नाही. लोक घेत ना आत्ता आपलं नाव? आपले काय जाते?"

 "तू याकरता आम्हाला चूतिया बनवलेस!" ते सारे किंचाळले. "चल, चालता हो! यापुढे तू आमच्या महफिलीत येऊ नकोस. आमच्याबरोबर बसू नकोस. आमच्याशी बोली-

महफिल । ७७