पान:लाट.pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तरी सोडून गेला होता. त्याचे अंत:करण त्या बाईविषयीच्या करुणेने ग्रासून गेल्यासारखे त्याच्या शब्दांवरून वाटत होते. त्याच्या शब्दांचा त्यामुळे त्या लोकांवर अतिशय परिणाम झाला. त्यांनी विचारले, “आपण कशी मदत करणार तिला? कोणत्या मार्गाने?"
 "मार्ग मी सांगतो. इसाकच्या सासूलाच आपण सारे करायला सांगू झाले!"
 "पण काय करायला सांगायचे?"
 “काय? काय सांगायचे?" थोडा वेळ थांबून तो म्हणाला, “पोर पाडायचे!"
 "पोर पाडायचे"' त्या लोकांनी दचकून विचारले.
 "अर्थातच! पाडायचे नाही तर काय ती बाळंत होईपर्यंत थांबायचे? चार गावात बोंब होईपर्यंत डोळे मिटून बसायचे? हा आपल्या गावच्या इभ्रतीचा सवाल आहे!"
 दिलावरच्या या बोलण्याने त्याच्या बेताला असलेला काही लोकांचा विरोध मोडून पडला. पुन्हा पूर्वीसारखे इसाकच्या गळ्यात त्या बेताचे उत्तरदायित्व येऊन पडले.
 इसाकची सासू दुसऱ्या दिवशी सकाळीच धापा टाकीत खतीजाच्या घरी गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “हे बघ, मी सारा बंदोबस्त केलो हाये. आज राती आपुन काम करून टाकू."
 “पन माझ्या पोरीच्या जीवाला काय अपाय होनार नाही ना?"
 "नाय. तू कसली काळजी करू नुको. रातची तयार राहा. मी येते.”
 "बरा बरा." खतीजाची आई उद्गारली. त्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हते!
 त्या दिवशी दिवसभर इसाक, त्याची सासू आणि दिलावर एकमेकांशी खलबते करीत राहिले. कुणाला सुगावा लागू न देता सारे गुप्तपणे कसे पार पाडायचे याच्या त्यांनी मसलती केल्या. त्यांनी कुठून तरी कसले तरी गावठी, जालिम औषध पैदा केले.
 रात्र होताच सारे इसाकच्या घरी जमले आणि काळोखाच्या आवरणाखाली तिथून खतीजाच्या घरी गेले. दबकत दबकत आणि सावधपणे चालत ते चटकन त्या घरात शिरले. आणि एका खोलीत जाऊन बसले. इसाकची सासू आत गेली. खतीजाला तिने एका खोलीत घेतले आणि आतून दरवाजा बंद करून टाकला.
 त्या बाहेरच्या खोलीत बसलेल्या लोकांच्या हळूहळू गप्पा सुरू झाल्या. अनेक विषय चघळण्याचा प्रयत्न ते करू लागले. पण त्यांना ते जमेना. मनातल्या मनात ते विलक्षण अस्वस्थ होऊन गेले होते. आतल्या खोलीकडे त्यांचे कान लागले होते आणि खतीजाच्या कण्हण्याचा आवाज तेव्हा त्यांना ऐकू येऊ लागला, तेव्हा तर ते बोलायचेदेखील बंद झाले. तो कण्हण्याचा आवाज ऐकत राहिले.
 त्या आवाजाने त्या लोकांना विलक्षण अस्वस्थ करून सोडले. त्यांची मने गांभीर्याने भरून गेली. तिच्या दुर्दशेबद्दल ते हळहळू लागले.
 परंतु दिलावरला तशा स्थितीत एकाएकी विनोद करण्याची लहर आली. तो दबत्या आवाजात पुटपुटला, "बघा, बघा कशी बकऱ्यासारखी ओरडते आहे!"

 "असे बोलू नकोस, विनोद करू नकोस." इसाकने म्हटले. त्या कण्हण्याने त्याला

महफिल । ७५