पान:लाट.pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "ती रस्त्याने चालली होती आणि काळोखात तिला माझा धक्का लागला. मी तिला ओळखले. तेव्हा ती म्हणाली, 'दिलावर दादा, मी तुमला रस्त्यात भेटलू ती कुणाला सांगू नुको हां-"
 "मग तू काय म्हणालास बरे?"
 "नाही सांगणार! मला लोकांना सांगायची काय जरुरी पडली आहे?"
 "कसम खा...सांगणार नाही म्हणून कसम खा." ती म्हणाली.
 “कसमेची काय जरुरी आहे? तू मला माझ्या भयनीपरमाने आहेस. मी तुझे गुपित कुणाला बोलून दाखवणार नाही."
 "पण ते गुपित तरी काय?"
 "ते मी तिला विचारले नाही. पण ते आपल्याला तर्काने ओळखणे सोपे आहे. ती कुणाला तरी भेटायला गेली असणे शक्य आहे."
 पण या त्याच्या उत्तरावर कोणी सहजासहजी विश्वास ठेवायला तयार झाले नाही. तो तिला ते न विचारण्याची गफलत करील ही कल्पनाच कुणाला पटली नाही. “आम्हाला पटत नाही. तिला तू विचारले नाहीस?"
 “विचारणार होतो. पण तेवढ्यात कोणीतरी आल्याची चाहूल लागली तेव्हा ती चटकन निघून गेली."
 त्या लोकांनी त्याला अधिक प्रश्न विचारणे यानंतर थांबविले. एकूण साऱ्या प्रकाराचा ते आपल्या मनाशी विचार करू लागले. शक्याशक्यतेचा अदमास घेऊ लागले. तिचा प्रियकर कोण असावा याचा अंदाज करू लागले.
 दिलावरने त्या रात्री त्या लोकांना असे गोंधळात टाकले. ते आपापल्या घरी गेले आणि सरळ झोपी न जाता आपापल्या बायकांना विचारू लागले, "काय गो? ती खतीजा कैशी मुलगी हय!"
 "का बरा?"
 "राती ती मला रस्त्यात दिसली. रस्त्यानी जात होती. एकटी होती आनी घाबरलेली दिसत होती. इतक्या रात्री खय गेली होती?"
 "तुम्ही हटकले नाही?"
 “नाही. ती थोपली नाही. लगेश नायशी झयली."
 "काय म्हायेत?" त्या बायका उत्तरल्या. परंतु मनात त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निश्चय केला. नवऱ्याने सांगितलेली कथा त्यांनी इतर बायकांना सांगितली, तेव्हा प्रत्येकीच्या नवऱ्याने खतीजाला त्या रात्री पाहिले असल्याचे कळून आले. खतीजा नक्कीच कुणाला तरी भेटायला गेली असली पाहिजे, याबद्दल त्यांची खात्री पटली.

 पण कुणाला तसा नेमका सुगावा मात्र लागला नाही. खतीजाचा प्रियकर कोण असावा हे कुणाला सांगता आले नाही. त्यांच्या महफिलमध्ये लागोपाठ अनेकदा तो विषय चर्चिला गेला. दिलावरने पाहिलेल्या प्रसंगावर विनोद झाला. तिच्याविषयी थोडं अश्लीलही बोलले

७२ । लाट