पान:लाट.pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिगारेटही नव्हती. वास्तविक ती असायला हवी होती आणि टॉर्चच्याऐवजी काळोखात त्याने रस्त्याने चाचपडत येणे अधिक संभवनीय होते. पण तो आला हेच अधिक महत्त्वाचे होते. तो सावकाश आपल्या झुकत्या चालीने चालत पुलापाशी आला आणि त्या जमलेल्या लोकांना म्हणाला, "काय? तुम्ही लोक केव्हा आलात?"
 त्याला पाहून त्या लोकांना एकदम हुरूप आला. त्यांच्यातला निघून गेलेला प्राण जणू परत आला. त्यांना सुरसुरी वाटू लागली. ते हुशारीने बसले. नाराजीने दिलावरला म्हणाले, "किती उशीर केलास!"आधी तो काही बोललाच नाही. नुसता खोकला. मग सावकाश आपल्या खिशातल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढून ती त्याने शिलगावली आणि तिचा झुरका मारून किंचित हसल्यासारखे करीत तो उद्गारला, “आज एक गंमत झाली."
 लोकांमध्ये औत्सुक्य निर्माण करण्याचे हे त्याचे एक खास कौशल्य होते आणि त्याचा तसा तात्काळ परिणामदेखील होत असे. त्या सगळ्यांनी ते ऐकून कान टवकारले. आता आपल्याला कुणाचे तरी कुलंगडे ऐकावयास मिळणार, या आशेने त्यांनी आपले चित्त एकवटले.
 "मी जेवण होताच लागलीच इकडे यावयास निघालो आणि सरळ आलो असतो तर केव्हाच इथे येऊन पोहोचलो असतो. पण एक तर माझ्यापाशी टॉर्च नव्हता, काठी आवडत नसल्यामुळे मी ती घेतली नव्हती आणि रस्त्याने चालू लागल्यावर सिगारेट पेटवण्याचा विचार करीत होतो, तेवढ्यात मला कुणाचा तरी धक्का लागला. धक्का एवढ्या जोराने लागला की, मी कोलमडलो. पण सावरून उभा राहिलो तेव्हा कमऱ्याची खतीजा समोर उभी दिसली."
 तिचे नाव तोंडातून बाहेर निघताच साऱ्याचे श्वास रोखले गेले. नाडीचे ठोके वाढले. रक्त जोराने वाहू लागले. मनात नाना तर्क सुरू झाले.
 कमऱ्याची खतीजा कुठे गेली होती?
 कुठे जात होती?
 इतक्या रात्री?
 अपरात्री?
 कुणाला भेटायला?
 हे काय गौडबंगाल आहे?
 "हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याचे मला दिसत आहे." दिलावर म्हणाला. “पण त्यात अशक्य काय आहे? कमऱ्याची खतीजा कुणाला भेटायला जाऊ शकत नाही काय?"
 “नाही. आम्हाला हे पटत नाही."त्या साऱ्यांनी म्हटले.
 "आपणाला हे पटवून घेतले पाहिजे."

 “का बरे?"

महफिल