पान:लाट.pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महफिल


 तो गाव एका खोऱ्यात बसला होता. धनधान्याची तिथे विपुलता होती. मुबलक पाणी मिळत होते आणि सुख तिथे नांदत होते. त्यामुळे फारसा कामधंदा न करण्याची त्या गावच्या लोकांना सवय झाली होती. ते लोक आळशी बनले होते. सकाळी दहा वाजेपर्यंत झोपा काढीत होते. खात होते, पुन्हा अंथरुणात लोळत होते. शहर गावापासून दूर असल्यामुळे करमणुकीचे काही साधन त्यांना उपलब्ध नव्हते. त्यांना कसले खास शहरी शौकही जडले नव्हते.
 असे ऐद्यासारखे जीवन व्यतीत करणाऱ्या त्या गावच्या जवान लोकांना आपला वेळ कसा घालवावा हे कळत नसे. ते रोज रात्रीचे जेवण होताच आपल्या दारातून बाहेर पडत आणि गावापासून फर्लांगभर अंतरावर रस्त्याला बांधलेल्या पुलापाशी गोळा होत. त्या पुलावर ते बसत आणि गप्पा ठोकत. रात्रीच्या काही घटका व्यतीत करीत.
 रोज रात्री पुलावर बसून गप्पा मारण्याचे फक्त एक व्यसन त्यांना जडले होते. या गप्पा मारल्याखेरीज त्यांना रात्रीची चैन पडत नसे, त्यांना खरंच झोप लागत नसे, बरे वाटत नसे. या गप्पांची अशी मोहिनी त्यांच्यावर पडली होती की, आपल्या बायकांचीदेखील त्यांना तमा वाटत नसे.
 गप्पांच्या त्या ओघात अर्थात अनेक विषयांचे चर्वितचर्वण होई. गावातल्या अनेक बातम्या कळत, अनेक रहस्ये उलगडली जात; आणि कित्येक गुप्त गोष्टींवर प्रकाश पडे. त्याचबरोबर एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्यादेखील काढल्या जात. एकमेकांची वेळप्रसंगी टिंगलदेखील केली जाई. पण गप्पांची ती जालिम अफू त्यांना तिथे सतत गुंगवून ठेवीत असे
 अर्थात सारे काही तिथे बोलत नसत. काही नुसते बोलत राहत आणि उरलेले फक ऐकत! काही जण प्रेक्षकांची भूमिका पार पाडीत. आपल्यापाशी सांगण्यासारखे असलेले काही जण त्यात असत. तसेच स्वत: त्या कुणाच्या सांगण्याचा विषय बनलेलेही त्यात असत. त्या बोलणारातले मात्र काही थोडेच आरंभापासून अखेरपर्यंत आपला प्रभाव पाडीत असत.

 दिलावर हा या रात्रीच्या 'महफिल'चा एक प्रमुख सूत्रधार होता. अशी 'महफिल' गाजवावयाचे एक खास कौशल्य त्याने हस्तगत केले होते. त्याच्यापाशी विनोदी कथांचा फार सुकाळ होता. आणि सतत बडबडत राह्यची हातोटी त्याने साध्य केली होती. लोकांच्या

६९