पान:लाट.pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एकदम अलोट पैसा मिळण्याचा तो राजमार्ग दिसताच अबदुल्ल्याचं मन दिपून गेलं. पैशाच्या चकचकत्या ढिगाऱ्यावर बसून त्यानं शेखमहंमदासारखी, त्याचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्याच्या कमरेत हजारदा एक सणसणीत आणि काल्पनिक लाथ हाणली! काही लोकांना पैसे याजी देऊन तो पुन्हा याजाचे याज खाऊ लागला. आणि त्या याजाचे याजाचीही रक्कम त्याला बिनबोभाट मिळू लागली! तो अधिकच गबरगंड झाला!
 पण सगळं प्रत्यक्षात व्हायला अद्याप दोन महिन्यांचा अवधी होता आणि हे वर्ष जर असंच रिकामं गेलं तर वीस हजारांचे साडेएकोणीस हजार व्हायला अवकाश राहणार नव्हता. पुन्हा वर्षानं आणखीन पाचशे घटणार! पुन्हा पाचशे! पुन्हा पाचशे-अशा रीतीने काही वर्षांनी तो पुरताच कफल्लक होणार होता. एकदम कफल्लक! मग त्याचं पुढं कसं होणार? काय होणार?
 नेमका तेव्हाच हिवाळा सुरू झाला. काही लोकांचे मळे वांग्याच्या रोपांनी डुलू लागले; मुळ्याच्या भाजीनं बहरून गेले. अबदुल्ल्याच्या मनात वांग्याचा मळा करण्याचे घोळू लागले. अहमद शफीला जाऊन त्यानं विचारलं, "गुदस्ता तुला भाजीत काय फायदो झयलो?"
 "इशेष नाय. पण भाजावन आटपली."
 त्याबरोबर अबदुल्ल्यानं वांग्यांचा धंदा करण्याचं निश्चित ठरवलं. लगेच तो त्या कामास लागला. त्यानं मळा नांगरून घेतला. खाडीच्या डोहात रहाट लावला. बारा हजार वांग्यांची रोपे लावली. अन उरलेल्या जागेत मुळ्याची भाजी पेरली. भोवताली लांबच लांब काटेरी कुंपण घातलं. राखणेस एक गडी ठेवला आणि आपणही अधूनमधून खेपा टाकू लागला...
 वांग्यांच्या रोपांना वांगी लटकली. हारे भरून वांगी अन् भाजी चिपळूणच्या बाजारात जाऊ लागली. वांग्यांचा पहिला भर अशा रीतीनं बऱ्या भावानं विकला गेला. पण तिसऱ्याचवथ्या दिवसापासून काय झालं कुणास ठाऊक, वांग्यांना हवा तसा भाव येईना. पुढे तर दर एकदम कोसळला. अबदुल्ल्याचे वांग्यांचे हारे तसेच पडून राहिले. त्यातच अहमद शफी येऊन त्याला म्हणाला, "यंदा सगळ्या धंद्याचो तुमी नास केलाव."
 "मी? मी काय केला बावा?"
 "तुमी नाय तर कुनी? बारा हजार रोपा कशाला लावलीत? अनी ह्यो धंदो करण्याची तुमाला काय जरूर होती?"
 "का र बावा? मना पोट नाय काय?"
 "पन आमचा पोट तुमी मारून टाकलाव ना?"
 अहमद शफी असा तणाणून गेला तेव्हा अबदुल्ल्याला संताप आला. 'धंदा काय, कुणीही करावा. ती काय अमक्याचीच मिरास आहे? आम्हाला पण मुलंबाळं आहेत! त्यांनी काय खावं? त्यांना अहमद शफी पुरवणार आहे वाटतं!' अशा रीतीनं बराच वेळ तो बडबडत राहिला.

 पण दुसऱ्या दिवसापासून भाव अधिकच घसरला. बाजारात वांग्याला कुणीदेखील विचारीना. हारेच्या हारे संध्याकाळपर्यंत तसेच पडून राहिले. मग मात्र अबदुल्ल्या हादरला.

६४ । लाट