पान:लाट.pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजव्यवस्था निर्माण होईल! नवी समाजव्यवस्था!..."
 मला बोलता बोलता दम लागतो आणि थांबून मी मेघाकडे पाहतो. तिला विचारतो, "तुला आता लाजल्यासारखं झालं काय?"
 ती खुदकन हसते अन् म्हणते, “छे: तू असा बोलू लागल्यावर मी भारावून जाते. मला ऐकत राहावंसं वाटतं. पण काय रे, मोठा झाल्यावर तुला माझी आठवण राहील?"
 ती असं बोलली की मला भडभडून येतं. जी ठरावीक माणसं आज माझ्या सान्निध्यात आहेत, त्यांना मी कधीतरी विसरणं शक्य आहे काय? पण ही पुढचं कशाला बोलते आहे? कशाला स्वप्नाचे इमले उभे करीत आहे?
 मी 'चुकचुक' करतो! तिला म्हणतो, “Trust no future however pleasant! कशाला उगाच शब्द उधळतेस!"
 तिला ते पटतं, अंधार पडू लागलेला असतो. आम्ही उठतो. एकमेकांचा निरोप घेतो.


 काळाचा ओघ विलक्षण वेगानं सरत असतो. ऋतुचक्राचा फेरा फिरतो आणि त्याच्या दात्याला अडकलेलं दिनचक्र फिरू लागतं. ते पूर्वीचे दिवस सरतात, स्मृतिरूप होतात. पावसाळा येतो. थंडगार हवा! थबथबणाऱ्या पागोळ्या! जीर्ण काळोखे दिवस! उदासवाण्या भेसूर रात्री! विमनस्क संध्याकाळच्या भिववत्या सावल्या...
 माझ्याजवळ छत्री नसते. मी सहसा बाहेरही पडत नाही. जुना रेनकोट काढतो. पण त्याचं कापड ठिकठिकाणी फाटलेलं असतं. एकदा घालून गेलो तर पाण्यानं भिजून त्याला कसलीशी घाण येऊ लागली. मी तो वापरणं सोडून दिलं. बाकी मुंबईचा पाऊस दिलदार खरा! उगाच सारखा कुणाला त्रास देत नाही. कधी फोर्टमध्ये गेलो असताना पाऊस आलाच तर मेघाच्या ऑफीसचा आश्रय घेतो. तिच्याच चिमुकल्या छत्रीत सायंकाळचा चर्चगेटपर्यंत येतो.
 घरी येईपर्यंत कपडे ओलेचिंब झालेले असतात. रात्री अंथरुणावर पडलो की, छातीत विलक्षण कळा मारू लागतात. क्षयासारखा रोग उलटणार तर नाही ना या कल्पनेनं धास्तावतो. कावून जातो. उपडा होतो. छातीवर हात दाबून धरतो आणि तशाच अवस्थेत कधीतरी झोपी जातो...
 दिवस पुन्हा बदलले आहेत. नुकताच प्रताप नावाचा एक मित्र भेटला. फारा दिवसांनी आमची भेट झाली. म्हणाला, "मला जरा शॉपिंगला जायचंय. थोडं कापड खरेदी करायचंय!" माझ्या अंगातल्या फाटक्या शर्टकडे एकवार दृष्टी टाकून मी उठून त्याचेबरोबर जातो. तो कापड घेत असताना मी म्हणतो, “मलाही घ्यायचं होतं चार शर्टांंचं कापड! पैसे आणायला पण विसरलो!"
 तो म्हणतो, "मग घे ना. मी देतो आता. मागाहून दे मला!"

 "अच्छा!" मी म्हणतो. कापड महंमदच्या शिंप्याजवळ देतो. महंमदच्या बिलात बिल तयार होतं. पेढीवरून शिलाईचं बिल भरलं जातं. त्याला निदान एवढी सोय आहे हे नशीब!

बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट । ६१