पान:लाट.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असलेला एका मासिकाचा अंक होता. 'नाही तरी तुझा पत्ता या संपादकाकडून काढणारच होते. आणि कितीरे अश्लील लिहितोस?' तिनं मला स्पष्ट सुनावलं होतं!
 त्या आठवणीतून मी भानावर येतो. तिच्याशी बोल लागतो. "तुला हल्ली ऐकायला येत नाही काय? कित्ती वेळ हाका मारीत होते? अन् असा एकदम दचकतोस काय?" ती मला म्हणते. मी उत्तरतो, "त्याचं असं आहे. ओळखीचं कोणी भेटू नये अशी इच्छा असते. त्यांना चहा द्यायला माझ्यापाशी पैसा नसतो; बरे, भेटल्यावर त्याला चहाचा आग्रह न करता पुढे सटकलो की माझी मलाच रुखरुख लागून राहते."
 "हं!" ती एक उसासा टाकते. मग आपली चिमुकली पर्स उघडते आणि एकेक रुपयाच्या पाच कोऱ्या करकरीत नोटा काढून माझ्यापुढं करते. मी म्हणतो, "राहू दे."
 ती केविलवाणा चेहरा करून म्हणते, “घे ना!"
 "मला नकोत. खरंच नकोत."
 "असं काय? घे ना. बघ!"
 माझा नाइलाज होतो. ते पैसे मी मुकाट्यानं घेतो आणि खिशात टाकतो. तिचे पैसे घेऊ नयेत ही तीव्र इच्छा असते. पण माझ्या परिस्थितीमुळे ती कधीच सफल होत नाही. महंमदही मला पाच रुपये देतो. लेखनाचा पैसा अद्याप कोणीच देत नाही!...
 काल एक तारीख होती. मला मग आठवण येते. मेघाचा पगार झालेला असणार. घरी भिक्षुक बाप आहे. त्याला तिला ठरावीक पैसे पाठवावे लागतात. इथं चुलत्याकडे राहते. पण तो पैसेवाला असूनही एवढा कंजूष आहे की, जेवणाचेदेखील पैसे तिच्याकडून घेतो. बाकीचे पैसे तिला खर्च होतात; म्हणजे कॉलेजच्या टर्म्सकरता आणि थोडे स्वत:ला. त्यातही माझा पाचाचा वाटा!...
 "आपल्यापैकी कोणीच सुखी नाही हे बघून खरंच मला दु:ख होतं." मी म्हणू लागतो, "महंमदलादेखील कॉलेज सोडावं लागणारसं दिसतंय!"
 “परमेश्वराची इच्छा!" ती हताशपणे उद्गारते.
 मी उसळतो, पण तिला काहीच बोलता येत नाही. 'जाऊ दे' एवढंच पुटपुटतो. माझी नास्तिक मतं तिला माहीत आहेत. पण एका चित्पावनाच्या त्या मुलीवर झालेले संस्कार एवढे प्रबळ आहेत की त्या वादात ती माझ्यावरच संतापते!
 "तुझी प्रकृती कशी आहे?" ती मला विचारते.
 “काय धाड भरलीय मला?" मी म्हणतो, "तुझं कॉलेज कसं चाललंय?"
 "यंदाचं अखेरचंच वर्ष बाबा! मी कॉलेज सोडतेय."

 तिचं कॉलेज सोडण्याचं कारण मला माहीत आहे. पैसा नाही, नोकरी अन् कॉलेज असे श्रम तिला झेपत नाहीत म्हणून तिनं हा निर्णय घेतला आहे. मीही यावर अधिक बोलत नाही. कोपऱ्यावरील इराण्याच्या हॉटेलात तिथून उठून जातो. पावडरचा चहा गटागटा पितो. एका सिनेमाचा पास मिळाल्याची मला आठवण येते. मी मेघाला सांगतो, “तुला सिनेमाला जायचं होतं ना? माझा पास घे हवा तर."

बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट । ५७