पान:लाट.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काही वेळानं महंमद येतो. त्याचा आचारी दोन कप चहा घेऊन येतो. तो चहा बघून मला मळमळल्यासारखं वाटतं. महंमदला मग दिवसाचा रिपोर्ट सांगतो. तो जेवायला थांबण्याचा आग्रह करतो. जेवायचं म्हणजे आणखी दोन तास थांबायला हवं. ते शक्य नसतं. मी घरी परततो.
 दिवे लुकलुकत असतात. थोरला भाऊ कामावरून परत आलेला असतो. त्याच्या नजरेला न येईल अशा बेतानं घरात शिरतो. कपडे बदलतो. म्हातारी चूलती विचारते, "काय रे? झालं काम?" मी मानेनंच 'नाही' म्हणून उत्तर देतो.
 मग आम्ही सगळे जेवायला बसतो. जेवताना थोरला भाऊ विचारतो, “नाही ना जमत?" मी उत्तरतो, “नाही." मान खाली घालतो. जेवायला लागतो-पण का कुणास ठाऊक, घास घशातल्या घशात अडखळू लागतो. अन्नाची चव विचित्र वाटू लागते. एक तीव्र हुंदका येतो. मोठ्या प्रयासानं मी तो दाबतो. पण माझं मन अनावर होतं. कसेबसे दोन घास खाऊन उठतो. हात धुतो. त्या पाण्यात डोळ्यांतलं पाणी मिसळून जातं.


 खिशातला पैसा संपलेला असतो. दुसऱ्या दिवसापासून निष्क्रिय दिनक्रम सुरू होतो. घरातच बसून राहायचं. आळशासारखं लोळायचं. जेवायच्या वेळी सगळ्यांच्या आधी हजर व्हायचं आणि मन लागलं की देहभान विसरून लिहू लागायचं!
 मग रविवार येतो. रविवारचं अगत्य मला नाही. माझा प्रत्येक दिवस हा रविवारच असतो. पण त्या दिवशी चार लोक घरी असतात. वेळ बरा जातो. त्यांचे रेल्वेपास वापरायला मिळतात. भटकता येतं.
 म्हणून मी रविवारी फिरायला जाणंच पसंत करतो. असेल त्या वेशात सरळ गाडीत जाऊन बसतो. एकदा वाटतं जुहूला जावं. पण स्टेशनपासून पुढं बसनं जायला पैसा नसतो आणि माझा वेषही तिथं जायला तितकासा धड नसतो. म्हणून मी चौपाटीवरच जातो.
 चौपाटी माणसांनी फुललेलीच असते. आपल्या अंगावर समाजातल्या सगळ्या थरांना खेळवीत असते. भेळवाले आणि काळाबाजारवाले, वाळकेश्वरवाले आणि गिरणगाववाले, मुंबईवाले आणि सबर्बनवाले! अठरापगड जाती तिथं गोळा झालेल्या असतात. रंगीबेरंगी पाखरं भिरभिरू लागतात. मादक वातावरण निर्माण होतं आणि विचित्र मन:स्थितीत मी ते सगळं पाहू शकतो-फुकट पाहू शकतो!
 इतक्यात मला मारलेली हाक ऐकू येते. "हमीद-ए-हमीद!' मी दचकून मागं पाहतो आणि निश्चिंत होतो. मेघा हाक मारीत असते. तिच्याबरोबर तिची छोटी चुलत बहीणही असते. दोघी येऊन माझ्या शेजारी बसतात.

 मेघा माझी वर्गमैत्रीण. दोन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र शाळेत होतो. पण मध्यंतरीच्या तिच्या अस्तित्वाची मला काहीच कल्पना नव्हती. डिसेंबर महिन्याच्या एका दिवशी तारापोरवाला अॅक्विरियममध्ये मला ती अवचित भेटली. आजच्यासारखी तिनं हाक मारली आणि आजच्यासारखाच तेव्हा मी दचकलो होतो. तिच्या हातात डिसेंबर महिन्याचा माझी कथा

५६ । लाट