पान:लाट.pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. पण पाकिस्तानची हालत दिवसेंदिवस बिकट होत असूनही त्यांचा लुंग्यांचा धंदा तिथं बरकतीत चालावा यात नवल नाही, एवढं अर्थशास्त्र मला कळतं. वाटतं, त्यांना देऊ का उत्तर, 'मग जा ना आपलं चंबुगबाळं आटोपून पाकिस्तानात आणि इथला धंदा माझ्या हवाली करा.' पण मला कुठलं असं उत्तर देणं जमायला? आणि पुन्हा विचार येतो, 'ते चिडून खरोखरीच गेले म्हणजे? एवढा व्याप, एवढा पैसा! माझ्याच्यानं काय होणार? तो कोण संभाळणार? मला आपली एकशे-वीस रुपयांची नोकरी पुरे!' हे सगळे सुविचार माझ्या डोक्यात आल्यामुळे मी त्यांना म्हणतो, “दुसऱ्या कुठं नाही तर नाही, पण तुमचे एवढे धंदे चाललेत, त्यात काही द्या ना काम?"
 ते तिरस्काराच्या स्वरात मला विचारतात, “तुमच्यानं काय होणार आहे काम? एकदा माणूस हे असं लिहायला लागलं की फुकट गेलंच म्हणून समजा. आमच्या धंद्याची आम्हाला ट्रॅजेडी करून घ्यायची नाही!" आणि ते मोठमोठ्याने हसू लागतात.
 मला ते ऐकू येत असतं. आणि तरीही त्यांच्या छोकरीच्या घरातल्या विलोभनीय हालचालींकडे मी पाहत असतो. आणि एकदम माझं मन हलकेच पुटपुटू लागतं, 'ही छोकरी तर तुझ्यावर फिदा झालेली आहे. तिच्या हालचाली बघ कशा तुझं लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत! तिच्या रूपानं तुझं नशीब आज तुला साद घालीत आहे. मग बिचकतोस कशाला? दिरंगाई कसली? उचल तिला! पळव! उडव! काय हवं ते कर? रझाक साहेबांच्या अफाट संपत्तीचा वारस होण्याची ही आयती चालून आलेली संधी आहे. मग का दवडतोयस? निदान नशिबाचा हा डाव खेळायला तरी काय हरकत आहे? लागला लग्गा तर ठीक; नाही तर मग आहेच नेहमीचं वणवण भटकणं...'
 पण माझं दुसरं मन त्याला उत्तर देतं, 'मूर्खच आहेस! अरे, ती कुठं, तू कुठं? ही सगाई तुला सहजासहजी पचनी पडेल काय? का उगाच नसत्या फंदात पडतोयस बाबा? तुला काही इज्जत, अब्रू आहे का नाही? लेखक म्हणून तुला थोडीफार कीर्ती मिळत आहे. एका प्रतिष्ठित घराण्यातला तू युवक आहेस. तुला ही पळवापळवी शोभेल काय? बेहत्तर आहे हालात दिवस काढावे लागले तरी!'
 दोन मनांच्या या सुंदोपसुंदीकडे मी लक्षच देत नाही आणि देतो तेव्हा दुसऱ्याचीच बाजू मला पटू लागते. मी सभ्य असल्याची मला जाणीव होते आणि सगळेच सभ्य लोक लाचारीतदेखील आपला सभ्यपणा सोडीत नसल्यानं त्या लाचारीला म्हणजेच पर्यायानं सभ्यतेला मी चिकटून राहण्याचा निर्णय घेतो. शेठजींच्या छोकरीच्या हालचालींकडे सभ्यपणे कानाडोळा करतो. एवढ्यात ते उठून जायला निघतात आणि मीही माझ्या नोकरीचा प्रश्न तसाच अर्धवट टाकून चालायला लागतो.

 एव्हाना दुपार टळलेली असते. भुकेनं माझा जीव जायला आलेला असतो. विलक्षण थकवा वाटू लागतो. मग वाटतं, महंमदकडेच जावं. महंमद माझा मित्र. एका शेठजींचा छोकरा! त्याच्याकडे अंधेरीला येतो. पण तो कुठं बाहेर गेलेला असतो. मी बसतो. एकदा मध्येच त्याच्या सैंपाकघरात उगाचच चक्कर टाकतो.

बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट । ५५