पान:लाट.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट

 ज्या दिवशी माझ्यापाशी पैसा असतो (मग तो एक आण्यापासून एक रुपयापर्यंत असो) त्या दिवशी मी थोडाफार दुःखी होतो. हे ऐकून तुम्ही मला वेड्यात काढाल हे मला माहीत आहे. पण माझ्या दुःखाचं कारण वेगळं आहे. पैसा नाही हे गृहीत धरून मी जो माझा निष्क्रिय जीवनक्रम आखलेला असतो तो नेस्तनाबूद होतो म्हणून मला दु:ख होतं. पैसा नसूनही पैशाचं सुख भोगण्याची जी काल्पनिक तृप्ती एरवी आणता येते, ती त्या दिवसापुरती तरी नष्ट होते. खरोखर पैसा असलेल्या माणसासारखं मला त्या दिवशी वागावं लागतं. ठेवणीतले कपडे काढावे लागतात. गबाळेपणा टाकून व्यवस्थितपणा धारण करावा लागतो आणि चार बड्या लोकांच्या घरचे उंबरठे झिजवण्यासाठी बाहेर पडावं लागतं.
 मग सकाळचे नऊ वाजले असताना त्या लोकांना साखरझोपेतून उठवावं लागतं. यामुळे 'ते अर्थातच माझ्यावर चिडतात व संतापून विचारतात, "तुम्हाला काही काळवेळ कळते की नाही? आधी बाहेर व्हा बघू!" मी शरमून बाहेर जाऊन उभा राहतो. काही वेळाने हे महाशय हात-तोंड धुऊन बाहेर येतात व मला आत बोलावतात.
 मी बावळटपणे हसत पुन्हा आत प्रवेश करतो. आपला अपमान झाला आहे असे जे उगाचच वाटत असते ते विसरण्याचा प्रयत्न करतो. अपमानाच्या जखमेवर त्यांच्या नंतरच्या स्वागताची मलमपट्टी लावतो. एवढ्यात ते विचारतात, "बोला. काय काम आहे?".
 इथं मी खरं पाहता गोंधळतो. माझ्या कामाची त्यांना आधीच कल्पना असते. पुन्हा आठवण देण्यासाठी किंवा काम झालेलं असलं अथवा होणारं असलं तर विचारण्यासाठी म्हणून मी आलेला असतो. लाचारीच्या स्वरात मी बोलू लागतो, “नोकरीच्या कामासाठी-"

 पुढचं मला ते बोलूच देत नाहीत. हल्ली नोकऱ्या मिळणं किती कठीण झालंय ते मला रसभरित वर्णन करून ऐकवतात. 'टायपिंग येतं का? शॉर्टहँडचा क्लास तरी जॉईन करा! निदान एखादी ॲडीशनल क्वॉलिफिकेशन असली तरी बरं पडतं.' इत्यादी वाक्यांची फैर झडते. आमच्या क्वॉलिफिकेशनचा इथं उपयोग होणार नसल्यामुळे मी तिचा मुद्दामच उल्लेख करीत नाही. मग आजच्या तरुण पिढीच्या अकार्यक्षमतेवर हल्ला चढतो. 'बघू जमलं तर.' असं मोघम आश्वासन मिळतं. पुन्हा वर एक कप चहा! यापेक्षा आणखीन काय

५२