पान:लाट.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "लक्ष्मीबायची शपथ घेऊन मी सांगतो की, आहमद खोताच्या उडवीला मी आग लावली नाही. जर मी आग लावली असेन आणि खोटी शपथ घेत असेन तर वर्ष, सहा महिन्यांच्या आत माझं पुरतं तळपट होऊन जाईल!"
 अण्णाचं हे बोलणं ऐकून गोंधळ शांत झाला होता. अण्णाचा शब्द नि शब्द सगळ्यांना स्पष्टपणे ऐकू गेला होता.
 शपथ घेऊन होताच अण्णा कासमखानांकडे वळून “येतो मी-" असं म्हणाला. झाल्या प्रकाराची चीड त्याच्या मुखावर दिसू लागली होती. बाहेर पडून त्यानं खुंटीवरला कंदील उचलला आणि वात मोठी करून खोकत खोकत तो घराच्या दिशेनं निघून गेला.
 बैठकीत मात्र तो गेल्यावर एकच गोंधळ उडाला. आग लावली कुणी ते कळलं नाही ते नाहीच! एवढे केलेले खटाटोप फुकट गेलेले पाहून मुसलमानांपैकी काही लोकांना घुस्सा आला आणि ते कासमखानांवर उखडले. त्यांची समजूत करीत कासमखान त्यांना म्हणाले, “आरडावरड अनी भांडनटंटा कशाला करायचा? कुनी आग लावली ती आज उद्या कवा तरी कलेलच. अन्नानं लावली असली तर त्याचा तलपट होयाला वेळ लागल काय?".
 कासमखानांनी असे सांगितल्यावर त्यांच्यापुढं कोणी काही बोललं नाही. परंतु मनातून प्रत्येकाला वाटत होतं की अण्णा गुन्हेगार आहे, त्याच्याबद्दल काही तरी व्हायला पाहिजे होतं. निदान त्याला गावकीनं दंड तरी ठोकायला हवा होता. पण आता या बोलण्याचाही काही उपयोग नव्हता. सगळ्या गोष्टी महालक्षुमीवर सोपविण्यात आल्या होत्या. वर्ष-सहा महिने तरी वाट पाहायला हवी होती. स्वत:चं असं जो तो समाधान करू लागला आणि बैठक समाप्त झाली. लोक घरोघर परतले.
 पुष्कळ दिवसानंतर मग गाव शांत झाला. काही दिवस आगीचं रहस्य कळावं अशी लोकांना उत्सुकता वाटत होती. हळूहळू तीही कमी झाली. काही दिवसांनी लोक बहुतेक सारं विसरून गेले. काही दिवस जे संशयाचं वातावरण होतं तेही नष्ट झालं. आगीचा प्रसंग लोकांच्या स्मृतिआड झाला. महाडकडचे वातावरण निवळल्याच्या बातम्या आल्या, तसं गस्त घालणंही बंद झालं आणि गावातल्या लोकांचे व्यवहार सुरळीतपणे चालू लागले. व्यवहारात जोडलेली गावातली माणसं, हा मधला काळ सोडला तर, पुन्हा जोडली गेली.
 आणि मग एक दिवस अण्णा मरण पावला. खोकून खोकून आणि झिजून झिजून मरण पावला. अण्णा मेल्याची बातमी कासमखानांना आहमद शफीनं सांगितली. कासमखानांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि मग एकदम त्यांना मागच्या गोष्टीचं स्मरण झालं. चटकन उसळून ते म्हणाले, “मेलो? मला वाटलाच होता!"
 आहमद शफीला त्याचं बोलणं आकलन झालं नाही. त्यानं विस्मयानं विचारलं, 'का? तो शीग होतो त्यावरना?"
 कासमखान आवेशाने उत्तरले, 'छे:, छे:! शीग असलो म्हणून काय झायला? शप्पत! शप्पत नडली! म्हालक्सुमीची शप्पत घेतलान ना खोटी? तलपट व्होयाला वेल लागलो

काय?"

तळपट । ४७