पान:लाट.pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनगटावरील मसूदखानची पकड त्याला जाणवेनाशी झाली. मसूदखानचा चेहरा त्याला विचारमग्न झालेला दिसला. आपल्या सत्य बोलण्याचा झालेला परिणाम पाहून त्याचे हृदय आनंदाने भरून आले.
 विचारमग्न मसूदखानने तेवढ्यात आपल्या बायकोला साद घातली आणि क्षणार्धात ती दरवाजात येऊन उभी राहिली. मुस्तफाखानने चटकन तिच्याकडे नजर वळवली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचेच हास्य पसरले असल्याचे त्याला दिसून आले. मसूदखानने तिला विचारले, "याला तू ओळखतेस?"
 ती हसून उत्तरली, "त्याला ना? ओळखते ना. समुद्रावर हा नेहमी फिरायला यायचा आणि तुमच्याविरुद्ध काही ना काही मला सांगत राह्यचा. पण तुम्ही काय त्याच्या नादी लागता? मी त्याच्या बडबडण्याकडे लक्ष दिले नाही. तुम्हीही देऊ नका. त्याला सोडा. आत या-घरात या-"
 ती अशी बोलता बोलता दरवाजातून पुढे आली आणि मसूदखानचा दंड धरून त्याला घेऊन जाऊ लागली. तेव्हा मुस्तफाखानचे लक्ष तिच्या शरीरयष्टीकडे वेधले. पहाटेच्या अस्पष्ट प्रकाशात पाहिलेल्या तिच्या देहाहून हा देह त्याला वेगळा किंचित जाड भासला. तिच्या शरीरातल्या बदलाने त्याला आश्चर्यचकित केले. तिच्या पोटाचा पुढे आलेला भाग त्याच्या डोळ्यांत खुपू लागला.
 आपल्याला हे आधीच कसे जाणवले नाही, दिसू शकले नाही? तिचे अश्रू आपल्याला दिसले. डोळ्यांतले मिस्किल भाव आपल्यापर्यंत भिडले होते. तिच्या यातना आणि दुःख आपल्या नजरेने टिपले आणि नवऱ्याविषयीची चेहऱ्यावर प्रकटणारी प्रीती हुडकली. मग हे एवढे कसे डोळ्यांना दिसले नाही?

 पण ते आता दिसताच त्याचा सारा आवेश गळून गेल्यासारखे त्याला वाटू लागले. आता अधिक काही बोलण्यात स्वारस्य उरले नाही, तिथे अधिक थांबण्यातही अर्थ नाही असा विचार त्याच्या मनात आला. मसूदखानने गचांडी मारल्याने एके काळी झालेल्या त्याच्या अवमानित स्थितीहून त्या क्षणी त्याला अधिक अवमानित झाल्यासारखे वाटू लागले. कसातरी तो तिथून बाहेर पडला आणि भडकलेल्या उन्हात घरचा रस्ता चालू लागला.

पराभूत । ४१