पान:लाट.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच्यावरच करावा! जी काय शब्दांची आग ओकायची ती प्रत्यक्ष त्याच्यावरच ओकावी! आणि त्या विचाराने एक दिवस भडकला गेल्यासारखा दुपारच्या भर उन्हात तो मसूदखानच्या घरी जाऊन धडकला.
 मसूदखान तेव्हा उघडाबोडका आपल्या घराच्या पडवीत बसला होता. त्याचे घामाने डबडबलेले आणि केसाळ शरीर फार ओंगळ दिसत होते. पूर्वीपेक्षा त्याचे पोट अधिक सटले होते आणि पोटऱ्या थलथलीत झाल्या होत्या. घामाने हैराण होऊन तो हातातल्या पंख्याने सारखा वारा घेत होता. मुस्तफाखानला अंगणात आलेला पाहताच त्याने बसल्या जागेवरूनच गुर्मीत विचारले, "काय आहे?"
 पहिल्या प्रथमच मुस्तफाखानने करारीपणाने मसूदखानच्या नजरेस नजर दिली. तो त्याच्याजवळ जाऊन भिडला आणि म्हणाला, "मला तुमच्याशी काही बोलायचे आहे."
 "काय आहे?" मसूदखानने पुन्हा दरडावल्यासारखे विचारले.
 "मला तुमच्या बायकोबद्दल काही बोलायचे आहे.”
 "काय म्हणालास?" मसूदखान ओरडला. त्याचा सारा नूर बदलला. तो संतापून गेला. मुस्तफाखानच्या अंगावर धावून गेला. त्याचा दंड पकडून पुन्हा ओरडला, "आधी इथून चालता हो बघू. नाही तर एक लाथ मारून बाहेर फेकेन."
 "ते मला माहीत आहे." मुस्तफाखान निर्भयपणे उच्चारला, “परंतु मला जे काही बोलायचे आहे ते बोलल्याखेरीज मी इथून जाणार नाही. मला बाहेर फेकलेस तरी तिथून मी ओरडेन. माझे बोलणे संपवीन आणि मगच निघून जाईन-
 "तू एक अत्यंत नीच मनुष्य आहेस. तुला खरे म्हणजे मनुष्य का म्हणावे असाही मला कधी कधी प्रश्न पडला आहे. कारण तू शुद्ध पशू आहेस. आजवर अनेक स्त्रियांशी लग्ने लावून तू त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केलीस आणि आता या नव्या बायकोची करणार आहेस. त्या शिकलेल्या, सुसंस्कृत मुलीला तू या घराच्या चार भिंतीत बंदिस्त करून ठेवली आहेस. तिला बाहेर पडायची, चार लोकांशी बोलायचीदेखील मोकळीक ठेवलेली नाहीस. कारण ती आपले खरे स्वरूप ओळखील अशी तुला भीती वाटते.
 "रोज पहाटे ती फिरायला येत होती. आणि तिला काही गोष्टी कळू लागल्या होत्या. मी तिला सारे सांगत होतो. तिला तुझे सत्य स्वरूप कळावे म्हणून धडपडत होती. परंतु तिला पहाटे बाहेर पडायचीदेखील तू बंदी केलीस आणि कधीतरी तिने जे तुला सांगितले असते ते सांगायची पाळी माझ्यावर आणलीस!
 "तू किती निगरगट्ट आहेस हे मला माहीत आहे, मी तुझे काहीच वाकडे करू शकत नाही हेही मला कळते. पण मी तुझ्या तोंडावर तुझ्याविषयी माझी खरी मते व्यक्त करू शकतो यातच मला आनंद वाटत आहे. त्यामुळे मला फार समाधान लाभले आहे. आणि माझ्या या कृतीचा परिणाम तुझ्या बायकोचे भले होण्यात होणार आहे अशी माझी खात्री आहे..."

 एवढे सारे एका दमात बोलून झाल्यावर मुस्तफाखानला अतोनात दम लागला. आपल्या

४० । लाट