पान:लाट.pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मसूदखानच्या चारित्र्यावर, त्याच्या एकूण वागण्यावर प्रखर हल्ले चढवू लागला. त्याची सरळ निंदा करू लागला आणि तिची उघड उघड स्तुती त्याने आरंभली.
 तो तिला म्हणाला, "तो तुमच्या लायक नाही, बिलकूल लायक नाही. तुमचा नवरा होण्याच्या बिलकूल पात्रतेचा नाही."
 "का बरे?"
 "का? कारण उघडच आहे. तुम्ही वेगळ्या आहात. फार चांगल्या आहात. निष्पाप मनाच्या आहात. स्वप्नातसुद्धा तुम्ही कुणाला दुखवले नसेल, फसवले नसेल. अशा स्त्रीचा नवरा व्हायची त्याची कशी लायकी असणार? पण त्याने तुमची पात्रता ओळखलेली नाही. म्हणून तर घराच्या चार भिंतीत तुम्हाला त्याने बंदिस्त होण्याची आज्ञा केली. पण तुमची पात्रता मी ओळखली आहे. तुमची योग्यता मी जाणली आहे."
 "तुम्ही ?"
 "होय.”
 "पण तुम्ही जाणून उपयोग काय?" ती हसून उत्तरली, “मला तुमच्याशी काहीच कर्तव्य नाही. माझ्या नवऱ्याने माझी पात्रता ओळखणे मी अधिक महत्त्वाचे समजते. त्याच्याच मतांना किंमत देते-दुसऱ्या कुणाच्या नव्हे!"
  तिच्या या युक्तिवादाने पुन्हा त्याला त्या क्षणी चीत केले. तात्पुरते नामोहरम करून टाकले. पुन्हा तो त्या दिवशी स्वस्थ बसला. पुन्हा दोघांत तात्पुरता अबोला निर्माण झाला. सागराचा आवाज तेवढा ऐकू येत राहिला. झाडांची सळसळ तेवढी जाणवत राहिली. आणि एकमेकांचे अस्तित्व तेवढे त्यांना सलत राहिले.
 पण एवढे होऊनदेखील ती येत राहिली आणि त्याच्याशी नेहमीसारखी बोलत राहिली. यातच तो मग स्वत:ला धन्य समजू लागला. तिच्या नवऱ्याविषयीच्या प्रेमाने भरलेला उत्कट स्वर त्याला तसाच सतत ऐकू येत राहिला. तिचे निरागस हास्य तसेच त्याच्या दृष्टीस पडू लागले. आणि तो तिच्या नवऱ्यावर आग ओकीत राहिला. सततची आग!
 परंतु एक दिवस त्या विस्तीर्ण किनाऱ्यावर एका कोपऱ्यात वाळूवर रेलती बसलेली तिची आकृती त्याला दिसायची बंद झाली. कायमचीच बंद झाली. तो तिला वेड्यासारखा सर्वत्र शोधू लागला. अनेक दिवस ती येत नाही हे माहीत असूनदेखील वेड्या आशेने तो पहाटे किनाऱ्यावर येऊ लागला आणि तिला धुंडाळत बसू लागला. पण त्याला ती पुन्हा कधीच दिसली नाही.
 काही दिवसांतच मसूदखान गावात आला असल्याचे त्याला माहीत झाले व तिच्या न येण्यामागचा अर्थ त्याच्या ध्यानात आला. अजूनपर्यंत पहाटे फिरायला जायचे जे स्वातंत्र्य तिला त्याने बहाल केले होते, तेही आता त्याने छिनावून घेतले असले पाहिजे, असे त्याला वाटले.

 त्याला वाटले आता पुरे झाले! स्वत:शीच मसूदखानचा तिरस्कार करीत राहणे पुरे झाले! त्याच्या बायकोला वळवणेही आता पुरे! प्रत्यक्ष त्यालाच आता जाब विचारावा! प्रहार प्रत्यक्ष

पराभूत । ३९