आपले सर्वस्वच लुटले जात आहे या भावनेने ती कासाविस बनून गेली. "हे शक्य नाही. कधीच शक्य नाही!" ती पुन्हा म्हणाली. तिचा गळा आता दाटून आला आणि डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
तो बोलायचा बंद झाला. तिच्या त्या प्रेमाच्या दीप्तीने दिपल्यासारखा तिच्याकडे पाहू लागला. हळूहळू तिची आसवे गालांवर ओघळू लागल्याचे त्याच्या ध्यानात आले आणि तो व्यथित झाला. कासाविस झाला. तिला आपण अशा यातना द्यायला नको होत्या, असे त्याला वाटू लागले. तो म्हणाला, 'आय अॅम सॉरी. तुम्हाला दुःख देण्याची माझी इच्छा नव्हती."
ती काहीच म्हणाली नाही. तशीच समुद्राकडे पाहत बसून राहिली. हळूहळू तिच्या गालांवरील आसवे सकून गेली. डोळे कोरडे झाले. चेहरा सौम्य, हसरा झाला आणि मग त्याला बरे वाटले. खूप बरे वाटले. मसूदखानबद्दल कितीही तिरस्कार वाटत असला तरी तिला दुःख व्हावे असे तो स्वप्नातदेखील कल्पीत नव्हता. किंबहुना तिने आनंदी राहावे म्हणून तर त्याची ही सारी धडपड चालली होती.
त्या दिवशी ती तिथून उठून गेली तेव्हा यापुढे ती फिरायला येणार नाही आणि आलीच तरी आपल्याशी एक शब्ददेखील बोलणार नाही असे मात्र त्याला वाटले. परंतु ती नेहमीसारखी दुसऱ्या दिवशी तर आलीच, पण त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली. इतकेच नव्हे तर तिने त्याला पाहताच हसून विचारले, “आज कुठल्या इराद्याने आला आहात?"
"कुठल्याही नव्हे. तुमचे मन:स्वास्थ्य बिघडवण्याचा माझा बिलकूल इरादा नाही."
"शुक्रिया!" ती हसून उत्तरली. पण त्या दिवशी तिलाच तो विषय काढण्यावाचून चैन पडले नाही. तिने विचारले, "तुम्ही असे सतत माझ्या नवऱ्याविरुद्ध का बरे बोलत असता?"
"मग काय करू? आमच्यासारखी सामान्य माणसे बोलण्यापलीकडे अधिक काही करू शकत नाहीत. पण निदान आम्हाला बोलता येते हेही काही कमी महत्त्वाचे नव्हे! अर्थात बोलायचे तर त्याकरिता योग्य ते माणूस मिळाले पाहिजे. सुदैवाने तेही मला तुमच्या रूपाने लाभले. म्हणून मी तुमच्यापाशी बोलत असतो. शिवाय तुमच्याशी बोलायला अधिक अर्थ आहे. तो मनुष्य कसा आहे हे तुम्हाला कळणे अधिक आवश्यक आहे."
"पण मला ते कळून घ्यायचे नसेल तर?"
"नका घेऊ, त्यामुळे काही बिघडले नाही. पण मी बोलत राहणार! सतत ऐकवत राहणार. कारण एक दिवस केव्हा तरी मी माझे म्हणणे तुम्हाला पटवू शकेन याचा मला विश्वास आहे."
"तुमची कल्पना चुकीची आहे. साफ चुकीची!"
पण तिच्या या उत्तराने तो काही बोलायचा बंद झाला नाही. त्याचा हिरमोड झाला नाही. किंबहुना आता तो अधिक हिरीरीने तिच्याशी युक्तिवाद करू लागला. नवऱ्याविषयीची तिची मते आपण बदलू शकू असे त्याला उगाचच वाटू लागले. तो दिवसागणिक तिच्यापाशी