पान:लाट.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अत्यंत क्रूरपणे वागतो याची तुम्हाला अद्याप जाणीव झाली आहे? पैशापलीकडे त्याला कसलीच मातबरी वाटत नाही हे तुम्हाला माहीत आहे? स्त्री आणि धन कुठल्याही वाममार्गाने मिळवण्याची त्याची तयारी असते, याचा तुम्हाला अनुभव आला आहे? म्हणूनच तो तुम्हाला दिवसा फिरायला पाठवू इच्छित नाही. आपल्या बायकोने चार लोकांत मिसळावे, बाहेर पडावे असे त्याला वाटत नाही, वाटणार नाही. तिने आपल्यासारखेच बनावे म्हणून तो प्रयत्न करीत राहणार, आपली मते तुमच्यावर लादणार. स्वत:सारखे तुम्हाला वागायला लावणार! तुमच्या स्वतंत्र व्यक्तित्वाला तिलांजली द्यायला लावणार!..."
 पुढे काय बोलावे त्याला कळेना. आपण केलेला प्रहार तिला कितपत जाणवला हेही त्याला आकलन होईना. जोवर तो बोलत होता तोवर तिच्या प्रतिक्रिया जाणणे त्याला शक्य झाले नाही. पण तो बोलायचा थांबला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
 ती हसत होती. नेहमीसारखीच हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती. एखाद्या लहान मुलाच्या बडबडण्याने मोठ्या माणसांची जशी करमणूक होते तशी तिची झाल्याचे तिचा चेहरा आणि डोळे त्याला सांगत होते.
 त्या हास्याने तो दुखावला! ते निर्मळ, निष्पाप हसणे त्याच्या जिव्हारी लागले. आपले सारे बोलणे असे सहजासहजी हसून तिने उडवून लावावे याचे त्याला दु:ख झाले. त्याला वाटले, तिला आपले बोलणे खरे वाटत नसावे.
 "तुम्हाला हे सारे खोटे वाटते?"
 "छे: छे:!" ती म्हणाली, "कदाचित खरेही असेल; पण मला खऱ्याखोट्याचा पडताळा कुठे घ्यायचा आहे?"
 "मग तुम्ही हसलात का?"
 पुन्हा तशीच हसत ती उत्तरली, “मी इथे आल्यापासून मला अनेकांनी माझ्या नवऱ्याबद्दल जे सांगितले, तेच तुम्ही मला ऐकवले. मी ते ऐकून केव्हाच कंटाळून गेले आहे. मग हसू नको तर काय करू? जे मला आधीच माहीत होते ते ऐकण्यात स्वारस्य तरी कसे येणार?"
 ती पुढे म्हणाली, "पण इतरांपेक्षा तुमचे सांगणे मला जरा वेगळे वाटते खरे! लोकांचा उद्देश माझे त्यांच्याविषयी मत कलुषित करणे हा होता. तुमचा तसा दिसत नाही. तुम्हाला ते खरोखरच भयंकर वाटतात. वाईट वाटतात. आणि अशा वाईट माणसापासून मी दर राहावे या अपेक्षेने तुम्ही सारं मला सांगताहात! तुम्हाला ते वाईट दिसले असतील, कदाचित तुमच्याशीही ते वाईट वागले असतील. पण मला ते चांगले वाटतात! खरंच, चांगले वाटतात."
 तो उपरोधाने हसून म्हणाला, "त्याने तलाक दिलेल्या साऱ्या बायकांना असेच वाटत होते. त्याच्याविषयी त्यांच्या अशाच भावना होत्या. पण अखेर त्यांचे काय झाले? तुम्हालाही अखेर तोच अनुभव येईल-"

 “अशक्य!" ती म्हणाली. पण या वेळी नेहमीसारखा तोल ठेवणे तिला शक्य झाले नाही. तिचा आवाज फार वेगळा, विचित्र निघाला. तिचा चेहरा पार बदलून गेला. जणू

पराभूत । ३७