अखेर त्याने प्रत्येकीला घटस्फोट दिला होता; आणि सध्याच्या बायकोला घटस्फोट द्यावयाला तो निघालेला होता.
मुस्तफाखामला हे सारे माहीत होते. मसूदखानला भेटायला जायचा विचारदेखील त्याला आवडत नव्हता. आपल्याकडे तो तुच्छतेने पाहतो, आपल्या नोकराचा मुलगा म्हणून आपल्याला वागवतो हे तर त्याच्या केव्हाच लक्षात येऊन चुकले होते. परंतु त्याचा इलाज चालत नव्हता. तो लाचार बनत होता आणि दर वेळी लाचारीने मान खाली घालून मसूदखानपाशी पैशांची मागणी त्याने केली होती.
पण मसूदखान त्याला सतत असा पैसा देत राहणे अशक्य होते. तिसऱ्या वेळी जेव्हा मुस्तफाखान त्याच्याकडे जाऊन उभा राहिला तेव्हा त्याने तोंड उघडण्यापूर्वीच मसूदखानने त्याच्यावर तोंड सोडले. त्याच्या आईबापांचा उद्धार केला. आणि त्याला गचांडी मारून घालवून दिले.
त्यानंतर पुन्हा म्हणून मुस्तफाखान मसूदखानकडे कधी गेला नाही. अवमानित झाल्याचे त्याला एवढे दुःख झाले की, घराबाहेर पडायचीदेखील त्याला लाज वाटू लागली. भकास मुद्रेने तो आपल्या घराच्या पडवीत सतत बसून राहू लागला.
अशा रीतीने घरी बसून दु:ख करीत असताना हळूहळू त्याच्या मनात मसूदखानविषयी अढी निर्माण झाली. हळूहळू त्याच्याविषयीचा तिरस्कार त्याच्या मनात दाटू लागला. हळूहळू तो मसूदखानचा द्वेष करू लागला.
आणि अजूनपर्यंत न जाणवलेली मसूदखानची अनेक कृष्णकृत्ये त्याला आठवू लागली. आपल्या बापाच्या हकनाक मृत्यूला तो जबाबदार असल्याची त्याच्या मनाची आता खात्री पटली. त्याने केलेली असंख्य लग्ने त्याला सलू लागली. त्याच्या अवाढव्य कमाईमागे काहीतरी काळेबेरे असले पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले.
पण त्याला आपण जाब विचारू शकत नाही, आपल्या बापाच्या मृत्यूबद्दलदेखील त्याला कोर्टात खेचू शकत नाही या विचाराने मुस्तफाखान हतबल झाला. एवढा मोठा अन्याय मुकाट्याने गिळण्याखेरीज आपल्यापुढे काहीच पर्याय नाही याची त्याला जाणीव होऊन चुकली आणि तो आतल्या आत तडफडू लागला. स्वत:च्या क्षुद्रतेची कल्पना येताच तो अधिकच विकल बनला. मसूदखानचा तो अधिकाधिक तिरस्कार करू लागला.
मसूदखान आपल्या बायकोला तलाक देणार असल्याचे गावात अनेक दिवस बोलले जात होते. एक दिवस त्याने खरोखरच बायकोला तलाक दिला. त्याची बायको आपल्या बापाकडे राहावयास गेली. गावात काही दिवस हा विषय चर्चिला गेला आणि मग विसरला गेला. काहीच झाले नाही अशा रीतीने लोक पुन्हा वागू लागले.
पण काही दिवसांनी मसूदखानची दुसरी (खरे म्हणजे नवी) बायको घरात असल्याचे वृत्त पसरले आणि ते खरेही ठरले. मसूदखानने पुन्हा एक लग्न केले.
पण या वेळी साराच मामला वेगळा होता. नेहमीसारखी त्याची बायको गावातली अगर जवळपासची नव्हती. ती मुंबईची होती आणि हे लग्नही परभारे मुंबईतच झाले होते. लग्नाची