पान:लाट.pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मूकपणे चालत दोघे पायवाटेला येऊन भिडली, तेव्हा तो चालायचा थांबला. आपला जबडा उघडून हसत तिच्याकडे पाहू लागला. "अच्छा. खुदा हाफिज."
 पश्चिम क्षितिजाला टेकलेल्या सूर्याच्या तांबड्या झगमगत्या गोळ्याकडे पाहत ती थरथरत पुटपुटली, "खुदा हाफिज." आणि चटकन वळून रस्त्याने अडखळल्यासारखी चालू लागली. रस्त्याच्या दिशेने जाऊ लागली. ते चाललेलें अंतर तिला आता फार वाटू लागले; भयंकरपणे जाणवू लागले. चढणीपर्यंतच तिला कितीतरी वेळ लागला.

 त्या चढणीवर जाऊन पोहोचताच तिने मागे वळून पाहिले. तो माळरानाचा प्रदेश आता अंधारात वितळून चालला होता. तीही अंधारात लोटली जात होती. त्याच्या प्रचंड सावलीसारखा तिला तो अंधार भासू लागला. त्या सावलीत गुरफटून गेल्यासारखे तिला वाटले. ती स्वत: त्या अंधारात वितळून जाऊ लागली आणि तिची पावले मात्र पूढेच पड़ लागली.

२८ । लाट