पान:लाट.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आकृतीच्या हालचालींवर ती मोहित झाली. आपले दोन्ही हात त्याने नांगरावर असे जोराने दाबून धरले की, नांगराच्या दोन्ही बैलांची शक्ती त्याच्यापुढे लुळी पडली. ते चालता चालता धडपडले. नांगराचा फाळ खोलवर जमिनीत रुतून बसला. बैलांनी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी जेव्हा नांगर पुढे ओढला तेव्हा मातीची प्रचंड ढेकळे जमिनीतून वर येऊन पडू लागली. त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर त्यांची धूळ उडू लागली.
 त्याच्या बळकट दबलेल्या खांद्यांकडे ती बघत राहिली. त्याच्या प्रचंड शक्तीच्या आविष्काराने विद्ध होऊन गेली. त्या सामर्थ्याने आपले जीवन व्यापून टाकले आहे असे तिला वाटले. आजवर जगलेले, भोगलेले जीवन कळाहीन वाटू लागले. आपले पंख पसरून ती त्याच्याकडे झेपावू लागली.
 पण तो दूर होता. फार दूर होता. त्याच्याजवळ जावे, फार जवळ जावे, असे तिला वाटू लागले. त्याक्षणी त्याच्या सान्निध्याचा तिच्या मनाने ध्यास घेतला. ती त्या खोपटात उभी राहिली आणि आपले सारे सामर्थ्य एकवटून ओरडली, "स्प्लेंडिड! स्प्लेंडिड!"
 तिचे वाऱ्याबरोबर थरथरत गेलेले शब्द त्याच्या कानावर आदळले. त्याने तिच्याकडे पाहिले. हसून आपला हात हवेत उडवला आणि पुन्हा तो पाहू लागला-आपल्या नांगर हाकण्याच्या कामात गढून गेला.
 पण त्या 'स्प्लेंडिड'वर संतुष्ट राहण्याची आता तिची तयारी नव्हती. ती पुन्हा तितक्या जोराने ओरडली, "मी येऊ काय? तुम्हाला येऊन मदत करू?"
 तिची वाक्ये कानावर पडताच त्याचे खांदे ढिले पडले. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्य प्रकटले. नांगर जागच्या जागी थबकून उभा राहिला. ढेकळे उडायची राहिली आणि धुरळा त्याच्या अंगावर येईनासा झाला, शेतातली माणसे हातातले काम थांबवून माना वर करून तिच्याकडे पाहू लागली.
 त्याचा चेहरा पुन्हा पूर्ववत दिसू लागला. त्याने हसून नकारार्थी मान हलवली. नांगर पुन्हा चालू केला. त्याचे खांदे पुन्हा दबून गेले. ढेकळे उडू लागली, धुरळ्यात तो माखला जाऊ लागला. त्या माणसांनी माना खाली घालून पुन्हा आपले काम सुरू केले.
 ती घामाघूम होऊन मटकन खाली बसली. क्षणभर हरवलेले तिचे अस्तित्व तिला पुन्हा येऊन बिलगले. स्वत:च्या वागण्याने आणि त्याच्या थंड उदासीन प्रतिक्रियेने ती शरमून गेली. - त्याने नांगर त्या माणसाच्या हातात दिला आणि तिच्या दिशेने तो चालत येऊ लागला, तेव्हा तिला भीती, विलक्षण भीती वाटू लागली. त्याने आपल्या अधिक निकट येऊ नये, असे तिला वाटू लागले.
 पण तो येऊन खोपटाखालीच उभा राहिला. तिथूनच म्हणाला, "चला, तुम्हाला घरी पोहोचायला वेळ होईल. आता थोड्याच वेळात अंधार पडेल."

 त्याचा आवाज तिला फार दुरून कुठून तरी ऐकू आल्यासारखा वाटला. तिचे मन भीतीमुक्त झाले. झपाझप ती शिडी उतरली आणि त्याच्याबरोबर, त्याच्या मागोमाग, माळरानावरल्या पायवाटेकडे जाऊ लागली.

ओअॅसिस । २७