पान:लाट.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याच्या जड आवाजाने तिच्या मनावर फार विलक्षण जादू केली. तिचे मन भारल्यासारखे झाले. तिने आपली दृष्टी त्याच्यावर रोखली आणि हसून ती मोकळ्या सुरात ओरडली, “इट इज अॅन ओअॅसिस...ओअॅसिस इन द डेझर्ट!"
 "होय. जन्नत म्हणजे तरी काय, ओअॅसिसच!"
 पण जन्नत आणि ओअॅसिस तिला एकच वाटली नाहीत. त्यातला फरक तिच्या मनात स्पष्टपणे उभा राहिला.
 "असे कसे? जन्नत ओअॅसिस कसे असेल?" तिने विचारले.
 "नसायला काय झाले? कुराणातले ओअॅसिस जन्नतसारखेच आहे."
 तिने अनेकदा कुराण वाचले होते. पण त्यातले जन्नतचे वर्णन तिला काही ओअॅसिसप्रमाणे वाटले नव्हते. पण आता ती ते आठवण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिला ते नीट आठवेनासे झाले.
 तिच्यासमोर स्वर्ग प्रगट होऊ लागला; जन्नत उभी राहू लागली. नितळ पाण्याचा एक झरा, हिरवे गवत, खजुराचे झाड आणि झऱ्याच्या काठावर बसलेल्या पऱ्या. तिचे अंग परीसारखे हलके होऊ लागले. तिला पंख फुटू लागले. . .
 मग हा कोण? हा दणकट अडाण्यासारखा दिसणारा, पण शहरी रीतिरिवाजाला . सरावलेला माणूस कोण? त्याचे आणि आपले नाते काय? या जन्नतीतला देवदूत? जिब्रईल? काही क्षणापूर्वीच आपल्याला तो राक्षसासारखा भासला याचा तिला विसर पडून गेला. तिला तो आता देवदूतच वाटू लागला.
 "या जळत्या उन्हात इकडे कशा काय आलात?" त्याने विचारले....
 तिचे पंख हवेत पसरले गेले. भराऱ्या मारीत तिच्या तोंडून शब्द ओघळू लागले. "खोलीत बसून बसून कंटाळा आला. आज एकटीच रस्त्याने चालू लागले. चालत चालत इथवर आले."
 "अच्छा. किती दिवस राहणार आहात इथे?"
 "दिवस कसले? आज संध्याकाळपर्यंतच! मी उद्या जाणार आहे!"
 त्याने पूर्वीसारखे "अच्छा" म्हटले. जणू ती राहिली आणि गेली याचे त्याला कसलेच सोयरसुतक नव्हते. त्याचे 'अच्छा' कानावर आदळताच तिचे पंख मिटू लागले. भिरक्या घेत ती पुन्हा जमिनीवर उतरू लागली.
 बोलता बोलता त्यांची नजर शेतात दूरवर फिरू लागली. एका शेतातल्या शेत नांगरणाऱ्या माणसाच्या आकृतीवर जाऊन स्थिर झाली. त्याचे नांगरणे त्याला चूकीचे वाट लागले, काही तरी त्याला खटकू लागले. तो तिच्याकडे वळून दिलगिरीच्या सुरात म्हणाला, "माफ करा हं. तुम्ही थोडा वेळ बसून राहा. मी आत्ता येतो."
 तिच्या मान हलवण्याकडे न पाहता तो भराभर शिडी उतरून खाली गेला. त्या माणसाच्या हातातून त्याने नांगर आपल्या हातात घेतला आणि तो स्वत: चालवू लागला.

 तिची नजर त्याच्या शेत नांगरणाऱ्या आकृतीवर जाऊन झेपावली. त्याच्या दणकट भव्य

२६ । लाट