आज ती येत नाही असे मला वाटू लागले. परंतु ते मान्य करायला मी तयार झालो नाही. ती न येणे अशक्य होते. कदाचित तिच्या आईबापांना काही कळले असेल म्हणून ती आली नसावी. पण त्यांची पर्वा करण्याचे मला काही कारण नव्हते.
मी झोपी गेलो नाही. टेबलावरचा दिवा जळत ठेवून मी आरामखुर्चीवर बसून राहिलो. मग काही वेळाने खोलीत येरझारा घालू लागलो.
ती बदलली असणे शक्य आहे. वारंवार तिने माझ्याकडेच कशाला यावे? तिला कोणी दुसरा सापडला असेल...किंवा ती स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल. पण ते तिला शक्य होणार नाही, हे मला चांगले माहीत होते.
येरझारा घालताना माझे तोंड दरवाजाच्या दिशेने झाले. आणि मी जागच्या जागी उभा राहिलो. दरवाजा हळूहळू उघडला जात होता. माझे मन काहीसे ताळ्यावर आले. मी पुन्हा आरामखुर्चीवर बसलो.
तिने नेहमीसारखे दार उघडले. परंतु पुढे न येता ती दारातच, दाराच्या चौकटीत दोन्ही हात ठेवून उभी राहिली. ती विलक्षण प्रसन्न दिसत होती. उत्साहाने नुसती फुलून गेली होती. मी पुटपुटलो, "ये. बस इथे."
ती घाईने पुढे आली. येताच तिने माझा हात हातात घेतला. तृप्त नजरेने माझ्याकडे पाहू लागली.
"मी आज आनंदात आहे-फार फार आनंदात आहे."
"म्हणून इतक्या उशिरा आलीस की काय?"
"छे! वास्तविक आज मी लवकर यायचं ठरवलं होतं. केव्हापासून येण्यासाठी धडपडत होते, पण यायलाच मिळालं नाही."
मी किंचित अस्वस्थ झालो.
"आज मला आईनं खूप उपदेश केला. यापुढं तरी मी व्यवस्थित वागावं अशी तिची अपेक्षा-”
"यापुढं विशेषसं काय होणार आहे?"
"तेच सांगायला आले. माझं लग्न ठरतं आहे!"
बोलायची थांबून ती माझ्याकडे पाहू लागली. तिची नजर माझ्यावर खिळून राहिली. असे टक लावून पाहत राहायची तिला सवय होती. अगदी प्रथम ती माझ्याशी बोलत बसली, तेव्हा याच नजरेने तिने माझा ठाव घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिच्या लग्नाच्या वार्तेची माझ्यावर कोणती प्रतिक्रिया झाली आहे, हे ती अजमावू लागली.
मला अर्थातच आश्चर्य वाटले. तिचे लग्न होणार नाही असे मी कधी गृहीत धरून चाललो नव्हतो. फक्त ते सहजासहजी होणार नाही, असे मला वाटत होते. मी स्वत:शीच हसलो. परंतु तिच्यापासून ते लपून राहिले नाही.
"का हसलात?"
मी उत्तरलो, "तुझ्याशी सहजासहजी लग्न करायला निघालेल्या माणसाचे मला हसू येते