Jump to content

पान:लाट.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "मी तुम्हाला त्या चाळीत पाहिलं आहे."
 "मीही तुम्हाला पुष्कळदा तिथूनच पाहिलं आहे."
 "मला तुम्ही ओळखत होतात?"
 "हो."
 "मग तसं कधी दाखवलं नाहीत?"
 "मला आवडत नाही."
 आम्ही काही वेळ स्तब्ध बसलो. या सगळ्या संभाषणाच्या वेळी ती माझ्याकडे सारखी टक लावून पाहत होती. तिची नजर सतत माझ्यावर खिळून राहिली होती.
 खोलीत अंधार पडायला आला होता. उठून मी दिवा लावला. मला जेवायला जायचे होते.
 "कुठे निघालात?" मी जायच्या तयारीला लागल्याचे पाहून तिने विचारले.
 "जेवायला."
 "एवढी घाई काय आहे? आता कुठे सात वाजले आहेत."
 मी तसाच खुर्चीवर बसून राहिलो. परंतु काही न बोलता एका मुलीच्या सहवासात बसून राहणे फार बिकट असते. मनाची उगाच उलथापालथ होते. तिची तीच इच्छा होती हे उघड होते. म्हणून मी काहीच बोलू शकलो नाही.
 "तुम्ही काहीच बोलत नाही?"
 मी नुसता हसलो. मला काहीच बोलायचे नव्हते. मला स्वस्थही बसायचे नव्हते. सरळ उठून जेवायला जावे, असा विचार करून मी उभा राहिलो.
 "बसा हो थोडा वेळ."
 मी हसून तिला म्हणालो, “माझी खाणावळ बंद होईल नवाला."
 'एक वेळ नाही जेवलात तर काय होणार आहे?'
 "काही नाही. न जेवल्याने तरी विशेष काय होणार आहे?"
 तिची नजर बदलली. चेहरा उजळला. हसून तिने म्हटले, “आज आमच्याकडे जेवा."
 "नको."
 "का? तुम्हाला हवे तर इथे आणून देते."
 "चालेल."
 थोडा वेळ बसून ती निघून गेली. दिवसभर काम करून मला कंटाळा आला होता. ती जाताच मी खोलीबाहेर पडलो आणि थोड्याच वेळात पुन्हा परतलो.

 मी आलो तेव्हा टेबलावर जेवणाचे ताट झाकून ठेवलेले होते. टेबलावरचा दिवाही तिने जळत ठेवला होता. जेवणाचे ताट ठेवून ती गेली का हे मला कळेना. मी जेवून घेतले आणि आरामखुर्चीवर वाचत पडलो. वाचताना माझे मन तिचा विचार करू लागले. ती येईल असे मला वाटू लागले. ती निदान जेवणाचे ताट नेण्याच्या निमित्ताने तरी...

१६ । लाट