पान:लाट.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दरवाजा बंद करून मी येताच पुन्हा माझ्या उद्योगाला लागे. त्या सबंध कुटुंबाशी माझा प्रत्यक्ष संबंध येत नसे.

 परंतु काही गोष्टी टाळणे अशक्य होते. त्यांचे अठराविश्वे दारिद्र्य मधला दरवाजा बंद केल्याने माझ्यापासून लपून राहू शकत नव्हते. माझ्या कसल्या ना कसल्या वस्तूची त्यांना वारंवार गरज लागत असे आणि मी मुकाट्याने त्यांना ती देत असे. मागण्याचे हे काम तो गृहस्थ करीत असे.

 पण एक दिवस बापाऐवजी ती मुलगी माझ्याकडे आली. मी तेव्हा नुकताच परतलो होतो आणि आरामखुर्चीत पडलो होतो. ती दरवाजात येऊन उभी राहिली तेव्हा तिच्याकडे माझे लक्ष गेले.

 त्यावेळी ती नुकतीच बाहेरून आली असावी. आपला वेष तिने अद्याप बदललेला नव्हता. नेहमीसारखे भडक रंगाचे पातळ ती नेसली होती. पावडर, रंग होतेच. शिवाय त्या दिवशी तिने डोळ्यांत काजळही जास्त घातले होते. माझे लक्ष जाताच हळू आवाजात तिने बापाचा निरोप मला सांगितला. त्याने पाच रुपये मागितले होते. मी मुकाट्याने पैसे तिच्यापुढे केले. ते घेताच एक शब्द न बोलता ती निघून गेली.

 आणि नेलेले पैसे परत करायलाही तीच आली. तो रविवार होता. एक चित्र पुरे करण्यात मी दंग झालो होतो. ती सावकाश दार ढकलून आत आली. प्रथम तिच्याकडे मी लक्ष दिले नाही.

 "तुमचे पैसे." ती पुटपुटली.

 "ठेवा तिथे." मी टेबलाकडे बोट दाखवले.

 परंतु पैसे टेबलावर ठेवून ती तशीच उभी राहिली. मला संकोचल्यासारखे वाटू लागले. चित्र काढायचे थांबून मी तिच्याकडे पाहू लागलो.

 ती तेव्हा अगदी साध्या वेषात होती. टवटवीत फुलाप्रमाणे नाजूक आणि प्रसन्न दिसत होती. काही न बोलता तीही माझ्याकडे पाहू लागली. मी म्हणालो, "बसा ना." ती बसली आणि मी पुन्हा चित्र पुरे करू लागलो.

 परंतु ती क्षणभरातच तिथून उठली. कडेलाच माझ्या पुष्कळशा चित्रांचा ढिगारा पडला होता. जवळ जाऊन त्यातले एकेक चित्र ती पाहू लागली.

 मी माझे चित्र पुरे केले आणि आरामखुर्चीवर बसून तिच्या हालचाली पाहू लागलो.

 तिचे माझ्याकडे बरोबर लक्ष असावे. चटकन तिने चित्रे होती तशी ठेवली आणि तीही एका खुर्चीवर बसली.

 "तुम्हाला चित्रकलेची आवड दिसते." मी विचारले.

 "होय. मी जे० जे० स्कूलमध्ये होते. पण पुढं कंटिन्यू करणं जमलं नाही."

 मी काही म्हणालो नाही, तिच्याकडे मी पाहत राहिलो.

 "तुम्ही पूर्वी त्या चौकानजीक राहत होता काय?"

 "हो. तुम्हाला काय माहीत?"

कळ । १५