पान:लाट.pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कळ


 तिच्यासंबंधी अनेक अफवा मी रोज ऐकत होतो. तिचा बाप दरिद्री होता आणि ती मात्र थाटात राहत होती. त्याला नेसायला अंगभर वस्त्रदेखील नव्हते आणि ती मात्र रोज नवी पातळे नेसत होती. तिच्या घरची माणसे फार सच्छील होती आणि ती मात्र रोज कुणा ना कुणाबरोबर शहरभर भटकत होती. तिचा एकदा गर्भपात झाल्याचाही उल्लेख अधूनमधून होत होता.

 मी तिला रोजच पाहत होतो. संध्याकाळच्या वेळी मी राहत असलेल्या खोलीच्या कठड्याशी उभा राहिलो की, ती रस्त्याने जाताना मला दिसत असे. रस्त्यावरील लोकांच्या नजरा तिच्याकडे वळत असत.

 काही दिवस मी माझ्या चित्रकाराच्या व्यवसायाला साजेशी स्वतंत्र खोली शोधीत होतो. तिच्या बापाची आणि माझी याच दरम्यान ओळख झाली. अडलेला तो गृहस्थ आपल्या दोनचार खोल्यांपैकी एक खोली मला द्यायला तयार झाला. तो तिचा बाप होता हे मला खोली पाहायला गेलो तेव्हा कळले. त्याने दिलेला पत्ता शोधीत मी जेव्हा त्यांच्या घरात गेलो, तेव्हा तो दारात उभा राहून आशाळभूतपणे माझी वाट पाहत होता. आत नेऊन त्याने मला खोली दाखवली. खोली स्वतंत्र होती. तिला बाहेरून वेगळा दरवाजा होता. आत न्हाणीघर होते आणि एका वेगळ्या दरवाजाने ती इतर खोल्यांना जोडली गेली होती. मी खोली पसंत केली आणि दुसऱ्या दिवशी यायचे ठरवून जायला निघालो. म्हातारा मला दरवाजापर्यंत पोहोचवायला आला.

 त्यावेळी ती कुठून तरी आली. दरवाजातून मी बाहेर पडत असतानाच एकदम ती समोर आली. तिने भडक वेष केला होता. चेहऱ्यावर खूपशी पावडर थापली होती. गालांना रंग लावला होता आणि ओठही रंगवलेले होते. माझ्याकडे तिने पुरते पाहिलेदेखील नाही. मला डावलून ती आत निघून गेली. ती आत जात असताना बापाने काहीशा शरमलेल्या नजरेने पाहिले आणि मला निरोप दिला.

 तिथे राहायला गेल्यानंतर काही दिवस मला तिच्या अस्तित्वाची जाणीवही झाली नाही. सकाळी मी फार लवकर आपल्या उद्योगावर जाई आणि रात्रीचा परभारे जेवून परत येई. मी परतायच्या वेळी ती नेमकी कुठे बाहेर गेलेली असे. दिवसभर उघडा असलेला मधला

१४