पान:लाट.pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केसांवरून हळुवारपणे हात फिरवला. इतक्या हळुवारपणे की, ती झोपेतून जागी होईल याचे जणू त्याला भय वाटत होते. तिचे तोंड दोन्ही हातांनी त्याने कुरवाळले. तिच्या मस्तकावर तो हळू हळू थोपटू लागला. ते अलगद हलू लागले. जणू काय लाजून ती 'नको-नको' म्हणू लागली. त्याच्याकडे कललेले तिचे डोके त्याने जोरात सरळ केले. परंतु त्याचा हात सुटताच ते गटकन पुन्हा त्याच्या दिशेला कलले.

 त्याच्या साऱ्या अवयवांतून पुन्हा दुसरी शिणीक धावली. काय होते आहे हे त्याला समजेना. कफन घेऊन खड्यावर माती ढकलावी, असे त्याच्या मनात आले. पण तिथून उठायला त्याचे मन राजी होईना. त्याचे हात नेहमीप्रमाणे कफनाकडे न धावता तिच्या गोऱ्या मुखावर फिरू लागले, तिच्या पापण्यांवरून सरकू लागले, तिच्या लांबसडक केसांशी चाळा करू लागले. तो हळूच तिच्या बाजूला सरकून बसला. तिच्या अगदी निकट बसला. तिच्या गारगार शरीराला त्याचे उष्ण शरीर भिडले.

 परंतु तेवढ्यात वाऱ्याचा कसा काय एक झोत आला आणि मेणबत्ती विझून गेली. खड्डयात गडद अंधार पसरला. त्याच्या डोळ्यांसमोर एकदम अंधारी आली. त्याला काहीच दिसेना. शेजारच्या गार स्पर्शाने त्याची संवेदना तेवढी जागृत राहिली होती. त्या स्पर्शाची त्याला एकदम शिसारी आली. चटकन तो बाजूला सरकला. त्याने डोळे गच्च मिटले आणि पुन्हा उघडले. हळूहळू काळोखी मोडली. त्याला किंचित दिसू लागले. तो भांबावल्यासारखा समोर पाहू लागला.

 अवघडल्यासारखे बसून बसून त्याचे हातपाय जड झाले. सगळे अंग भरून आले. गारवा अधिकाधिक अंगाला झोंबू लागला. काय करावे? उठावे? जायला निघावे?...कफन? कफनाचे काय? पण मग...

अवघडलेला पाय त्याने सहज लांब केला आणि नेमका तो तिला लागला. तोच स्पर्श! विचित्र स्पर्श! त्याने पाय काढला नाही, बाजूला घेतला नाही. अभावितपणे तो पुन्हा जवळ सरकला. सरकत सरकत जवळ गेला. तिला खेटून बसला. अगदी खेटून!

 गार अंग! बर्फाचा स्पर्श...नाकाचा शेंडा आणि लांबसडक केस...निमुळती बोटे...ताठ बोटे...गोठलेले रक्त...कलते तोंड...हसरे तोंड...किलकिले डोळे...अर्धवट उघडे डोळे...तो चमत्कारिकपणे शहारला.

 पुढे जावे? अजून? हात...हा काय हात! आणि ही बोटे? बोटांत बोटे गुंफली गेली. कुठे? तिची बोटे तर ताठ आहेत. थंड पडली आहेत. डोके हलते आहे...कलंडले आहे. नाही...काही नाही...थंडगार...नको नको! आणखी पुढे नको...

 किळसवाण्या भीतीच्या एका लाटेने त्याच्या मनाला मागे फेकले. त्याचे डोके बधिर झाले. संवेदना लुप्त होऊ लागल्या. सगळे शरीर जड झाले. तो तसाच बसला-बसून राहिला..

 पहाट होऊ लागली. झुंजुमुंजू झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाड्यांचा खडखडाट बंद झाला. पाखरांची किलबिल सुरू झाली. धुके फार दाटले. गारवा सगळ्या वातावरणात

१२ । लाट