पान:लाट.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कफनचोर


 सायंकाळच्या वेळी तीसचाळीस लोकांनी जनाजा कबरस्तानात आणला; आणि मरतिकाचे दफन करून ते निघून गेले. जराशा वेळाने अंधार पडला. काही कोल्ह्यांनी कोल्हेकुई करीत कबरस्तानातून खाली तळात उड्या घेतल्या. एक तरस धीमे धीमे आपली फरा ओढीत त्या कबरेपाशी आला आणि कबर खणण्याचा यत्न करून पुढे सटकला. मावळतीच्या चंद्राच्या क्षीण चांदण्याने सारे कबरस्तान धूसरपणे उजळून निघाले. झाडांच्या सावल्या चमत्कारिकपणे पसरल्या. बांधून काढलेल्या कबरी शुभ्र पुतळ्यांप्रमाणे उठून दिसू लागल्या.
 डोंगराच्या बाजूने कुंपणावरून उडी मारून तेवढ्यात रसूलने कबरस्तानात प्रवेश केला. असंख्य कबरीतून आणि मांडीमांडी वाढलेल्या गवतातून न अडखळता चालत तो अचूक मघाशी काढलेल्या कबरीपाशी आला. धूसर चांदण्यात त्याने मघाशीच काढलेली कबर निरखून पाहिली. कबरीच्या शेजारीच बोरीचे झाड होते आणि कबरीवर लावलेली सबज्याची झाडे सुकून एका कडेला झुकली होती. पलीकडच्या कुंपणाआडून सायंकाळी या खुणा त्याने पाहून ठेवल्या होत्या.
 हातातले फावडे आणि टोपली त्याने खाली ठेवली. लुंगी उलटी वर उचलून घट्ट बांधली. मग त्याने सावधगिरीने आजूबाजूला पाहिले. गाडल्या गेलेल्या माणसांखेरीज आता तिथे चिटपाखरूदेखील नव्हते.
 खाली वाकून कबरीच्या उंचवट्यावर ठेवलेले मोठाले धोंडे त्याने आधी बाजूला गवतावर लोटून दिले. सबज्याची लावलेली रोपे उपटून बाजूला फेकली. मग फावडे हातात घेऊन क्षणभर तो निश्चल उभा राहिला. पुन्हा त्याने आजूबाजूस पाहिले आणि मग भराभर तो फावड्याने कबरेवरची माती बाजूला ढकलू लागला. त्याबरोबर फावड्याचा खसखस आवाज त्या विचित्र शांततेत येऊ लागला.

 जमीन अगदी भुसभुशीत होती. भुसभुशीत वाळूची बनलेली होती. ह्या जागेत गावच्या अगदी एका टोकाला कबरस्तान याचसाठी बांधण्यात आलेले होते. या भुसभुशीत वाळूत पुरलेल्या माणसाची, वाळू लागून चार दिवसांत माती होऊन जात होती. यामुळे कोल्हे, तरस यांच्या भयाने कबर फारवर खोल खणण्याची जरुरी लागत नव्हती.