पान:लाट.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आईने प्रथम त्याच्या बडबडीकडे लक्ष दिले नाही; पण तो वारंवार हे बडबडू लागल्यावर ती म्हणाली, "पुन्हा तेच! तुला सांगितलं ना काय ते एकदा?" मग त्याला तिने सांगितलेल्या कथेची आठवण आली. त्याचे बडबडणे बंद झाले. चार-पाच दिवसांत तो बरा झाला. हिंडूफिरू लागला. त्याचे मन किंचित शांत झाले. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे तो मग आपल्या शेतावर जाऊ लागला.
 ते दिवस गवतकापणीचे होते. सकाळी आठाला तो घराबाहेर पडे तो रात्रीचा घरात (म्हणजे छपरात) परत येई. सकाळच्या चकाकत्या उन्हात उभे राहायला त्याला फार बरे वाटे. पण दुपारचे ऊन पडले की त्याच. जीव कासाविस होई. मजुरीवरची माणसे या उन्हात कशी काम करतात याचे मनाशी आश्चर्य करीत एखाद्या वृक्षाच्या सावलीत तो उभा राही. त्यांच्या धिप्पाड शरीरांची आपल्या किरकोळ देहाशी मनातल्या मनात तो तुलना करू लागे. परंतु फार दिवस शेतावर जाणेही त्याला जमेना. त्याला त्या माणसांबरोबर वावरण्याचा, बोलण्याचा कंटाळा येऊ लागला. काही दिवस त्याने असेच रेटले. आणि मग एक दिवस शेतावर न जाण्याचे त्याने ठरवले. त्याच्या मनातले संशयाचे आणि भीतीचे विचार मात्र नाहीसे झाले.
 त्या दिवशी सकाळी तो घरीच राहिला; आणि पुष्कळ दिवसांनी छपराचे आणि काळोखाचे विचार मात्र त्याच्या डोक्यात आले. 'काय हा काळोख घरात? धड चालायलासुद्धा जमत नाही!' तो स्वत:शीच बडबडला आणि नाइलाजाने त्याच छपरातल्या आपल्या जागेवर बसला.

 असे महिने दोन महिने तो बापासारखा छपरात बसून राहिला आणि एक दिवस सकाळीच त्याला रक्ताची एक जबरदस्त उलटी झाली...

छप्पर ।७