पान:लाट.pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्षयाने गाठल्याचा त्याचा संशय खरा ठरला. रक्त ओकून ओकून पंधरावीस दिवसांत ती खंगून गेली. अंथरुणातून उठून बसण्याचेही सामर्थ्य तिला राहिले नाही. त्या पहिल्याच खोलीत आता तिची खाट पडली आणि तिच्याऐवजी तिची आई शुश्रूषा करू लागली. धाकट्या पोरक्या मुलाची त्याच्या बापाच्या घरी रवानगी झाली.
 भीतीने आणि संतापाने तो स्वत:शीच धुमसत राहिला. पण मग त्याने मनाचा निश्चय केला. आई-बापांना बोलण्याचे, ऐकवण्याचे त्याने ठरविले. रागाने थरथरत तो एक दिवस आईबाप सचिंत बसली असताना ओरडला, "मी पहिल्यापासून सांगत होतो. तिचे सगळे अलग ठेवा. तिच्या वस्तूंचा संपर्क कशाला लावू नका. पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि ह्या पोरीनंसुद्धा! आता बघा! हिनं तिचं उष्टं खाल्लं, आता तुम्ही हिचं खा! सगळ्या घराचा एकदा तापा बसवून टाका!"
 दोघे स्तब्धपणे ऐकत राहिली.
 "सगळा जंगलीपणा आहे. तेच नडलं आहे! आता बस झालं! जरा हुषार व्हा! दुनियेत काय चाललंय ते बघा!"
 "कशाला बघायची आहे दुनिया आता? माझ्या नशिबात आलं खरं भोगायला!" अगदी असह्य होऊन रडत त्याची आई म्हणू लागली, “पण यावर काही इलाज नाही काय रे? माझी पोर यातून वाचणार नाही काय रे?"
 “नाही आई, नाही. रोग आता बरा होण्याच्या पलीकडे गेलेला आहे. थर्ड स्टेज आहे, थर्ड स्टेज! म्हणजे काय? अगदी शेवटची अवस्था. समजलं?"
 “काय सालं-काय साला नशीब तरी!" इतकेच अबासखान मध्येच बोलला.
 “कां नाही रे करीम? माझ्या जिवा, परवरदिगारनं मनात आणलं तर माझं सोनं बरंसुद्धा होईल. माझी नुसती न्होवरी रे करीम!" आणि अनावर वात्सल्याने ती रडू लागली.
 बायको रडू लागताच अबासखान पुन्हा म्हणाला, "रडायचं कशाला? ऑ? रडायचं कशाला? तिला दुवा करायची! तिला बघायची. जा, तिच्या खोलीत जा." तेव्हा मग ती उठून गेली आणि हे संभाषण एवढ्यावरच थांबले.
 बहीण आजारी पडल्यापासून करीम अतिशय सावधपणे घरात वावरत होता. स्वत:चे कपडे, खाणे-पिणे इकडे तो जातीने लक्ष देऊ लागला. स्वयंपाकघरात त्याची नजर प्रत्येक वस्तूवर बारकाईने फिरू लागली. आई बहिणीच्या खोलीत गेली असता संशयाने तो दाराबाहेर घुटमळू लागला. पुष्कळ वेळ घरात वावरणे त्या दिवसांत त्याला भीतीचे वाटू लागले. परंतु बाहेर कोठेही जायची त्याची वहिवाट नव्हती. बापाने पुन्हा एकदा त्याला शेतावर जायला सांगितले; पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही.

 बहिणीचे दुखणे कैक महिने रेंगाळले. तितके दिवस मनाच्या चमत्कारिक अवस्थेत त्याने घालवले. भीतीने भेदरल्यासारखा तो त्या दिवसांत वावरला. अगदीच वाईट दिसेल या भावनेने एकदा-फक्त एकदा-तो बहिणीच्या खोलीत डोकावला; पण फार वेळ तिथे थांबला नाही. दोन क्षणांतच तिथून तो बाहेर पडला.

। लाट