पान:लाट.pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिला याविषयी विचारले तेव्हा ती नुसती हसली; गंभीरपणे हसली. काही म्हणालीच नाही. मीही अधिक खोलात शिरलो नाही.
 परंतु पुढे पुढे तिचा साराच नूर पालटत गेला. तिच्या अंगावरची उंची वस्त्रे हळूहळू दिसेनाशी झाली, जागेचे भाडे थकू लागले. पैशांची तिला सतत चणचण भासू लागली. आणि आपला पूर्वीचा सारा गर्व फेकून देऊन ती माझ्यापाशी अधिक पैशांची मागणी करू लागली.
 "तुम्हां दोघांशिवाय मला कुणाचाच आधार नाही." ती म्हणू लागली, “दुसरे काहीच साधन उपलब्ध नाही."
 मी थंडपणे तिला म्हणालो, “दोघेच का बरे?" आणि तिच्या तोंडाकडे पाहिले.
 "मग काय?" ती रूक्षपणे हसून उद्गारली, “आता कोणी ढुंकूनदेखील बघत नाही माझ्याकडे. पूर्वीचे संबंध मी तुम्हा लोकांसाठी तोडले ते आता जुळत नाहीत. आणि जसजसे वय होते आहे तसतसे नवीन कोणी यायला तयार होत नाही."
 मी काहीच उत्तरलो नाही. मग तिनेच एकाएकी विचारले. “तुमचे दोस्त काय करतात?"
 "कोण रायबा?" मी विचारले.
 "होय."
 "मला काय माहीत? बरेच दिवस मला तो भेटला नाही."
 “पण मला माहीत आहे"-ती म्हणाली, "ते दुसऱ्या बायांकडे जातात."
 "तुला काय माहीत?"
 “शिवाने सांगितले.”
 "त्याला तरी कसे कळले?"
 "रायबानेच सांगितले. तो म्हणाला, मी काय करावे आणि काय करू नये हे मी ठरवणार. इतर बाया मला सुख देतात. काळी तसे देऊ शकत नाही. म्हणून मी त्यांच्याकडे जातो."
 रायबाचे काळीविषयीचे म्हणणे मात्र तंतोतंत खरे होते. तिच्या त्या सदासर्वकाळ संत्रस्त चेहऱ्याकडे आणि ओसरू लागलेल्या शरीराकडे पाहून काही क्षण सुखात घालवण्याची कल्पना हळूहळू माझ्या मनात येईनाशी झाली...त्या सहवासाची पूर्वीसारखी ओढ वाटेनाशी झाली. सावकाश तिच्याविषयी माझ्या मनात तिरस्कार निर्माण झाला. मी तिला भेटायचा बंद झालो. आणि शिवा मला तिच्याकडे जायला भाग पाडील या भीतीने त्यालाही भेटायचे टाळू लागलो.

 आणि पुढे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. एका मुलीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आणि मी पार बदलून गेलो. पूर्वीचे सारे ऋणानुबंध विसरून गेलो. सारा भूतकाळच माझ्या मनातून नष्ट झाला. फक्त ती मुलगी तेवढी राहिली. तिच्याशिवाय मला दुसरे काही दिसेनासे झाले, काही कळेनासे झाले. माझा वेळ तिच्या सहवासात जाऊ

१०६ । लाट