पान:लाट.pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिलेला तो प्रसंग सारखा मला आठवतो आहे."
 सुमित्रा गोखले चित्रासारखी स्तब्ध बसून माझं बोलणं ऐकत होती. थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग तिनं शुष्क स्वरात मला विचारलं, “तुम्ही तिचा इतका विचार का करता आहात?"
 तिच्या स्वरातल्या तटस्थपणाच्या भावनेची मला चीड आली. मी आवेगानं म्हणालो, "प्रेमासाठी एक माणूस आपला जीव गमावतो, स्वत:ला गळफास लावून घेतो, यात विचार करण्यासारखं काहीच नाही का? तिच्या दिव्य प्रीतीनं मी दिपून गेलो आहे. मृत्यूला मिठी मारणाऱ्या तिच्या उत्कट प्रीतीवर मी प्रेम करू लागलो आहे. वाटतं की, तिच्या प्रियकराच्या दृष्टीनं तिच्या या विलक्षण कृत्याचा अर्थ लावावा. तिच्या जीवनात डोकावून पाहावं."
 "तिच्या प्रियकराच्या दृष्टीनं?' सुमित्रा गोखलेनं चमकून विचारलं.
 तिला माझं बोलणं कळावं म्हणून मी पुन्हा म्हणालो, "मला वाटतंय की, ती आता माझीच चालतीबोलती प्रेयसी बनली आहे आणि तिनं आत्महत्या केली आहे. अशा वेळी माझ्या मनात कोणते विचार उसळतील याचा मी अंदाज घेतो आहे. एक सुंदर कथा घडवण्याचा मनातल्या मनात प्रयत्न करतो आहे."
 इतकं बोलून मी स्तब्ध झालो. त्या मुलीचाच विचार करीत राहिलो. पाहिलेला तो प्रसंग सारखा पुन्हा पुन्हा आठवू लागलो. आणि सुमित्रा गोखले माझ्याकडे पाहत राहिली. चित्रासारखी स्तब्ध बसून राहिली. आज तिनं इतर विषय काढले नाहीत. कुठल्याही कथेवरील वाद उकरून काढला नाही आणि संगीताचा विषय काढून एखादं गाणंही ती गुणगुणली नाही. मी माझ्याच तंद्रीत असताना "बरंय, येते." असं ती म्हणाली आणि निघून गेली.
 दुसऱ्या दिवशी ठरावीक वेळेला ती आली तेव्हाही त्या आत्महत्या केलेल्या मुलीचाच मी विचार करीत होतो. तिचं गळफासाला लटकणारं, हेलकावणारं प्रेत मला दिसत होतं. सुमित्रा गोखलेची मी नीटशी दखल घेतली नाही. हातानंच तिला बसायला सांगून मी पूर्वीसारखा बाहेर पाहू लागलो. हे बघून शुष्क स्वरात तिनं विचारलं, “अजूनही त्या मुलीचाच विचार करता आहात का?"
 "होय."
 आणि मी तिच्याकडे पाहिलं. ती भकासपणे आता बाहेर पाहू लागली होती. कसला तरी विचार करू लागली होती. मी आश्चर्यानं विचारलं, “तुम्ही कसला विचार करता आहात?"
 "त्या मुलीचा.” ती खिन्नपणे माझ्याकडे पाहत म्हणाली, "खरंच, माणूस प्रेम का करतो?"
 मी हसून म्हणालो, “सुमित्राबाई, या प्रश्नाचं उत्तर आजतागायत कुणाला सापडलेलं नाही."

 ती शांतपणे ऐकत होती. काही वेळ ती तशीच स्तब्ध बसली. मग एकाएकी माझ्याकडे वळून तिने विचारलं, "तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं आहे?"

लाट । ९५