पान:लाट.pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 परंतु दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा भरकटलेल्या मनानं मी नुसता पडलो होतो. मनात कसल्या तरी भावनांना कढ आले होते. मनातल्या उसळत्या भावनांचा कुणाजवळ तरी स्फोट करावासं वाटू लागलं होतं. अशा ऐन वेळी सुमित्रा गोखले आली. येताच नेहमीप्रमाणे हसत हसत तिनं विचारलं, “हॅलाव? कसला विचार चालला आहे?"
 मी सावरून बसत म्हणालो, “कसला नाही." आणि पुन्हा विचारमग्न होऊन बाहेर पाहू लागलो.
 असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं. सुमित्रा गोखले आल्याबरोबर मनातले विचार बाजूला फेकून देऊन मी तिच्याशी हव्या त्या विषयावर बोलू लागलो होतो. माझ्या मनातल्या उलथापालथीची दाददेखील लागू दिली नव्हती. परंतु त्या दिवशी मनानं इतका अस्वस्थ झालो होतो की, एरवी ती आली असताना आपोआप येणारा औपचारिकपणा निर्माण होऊ शकला नाही.
 माझी वेगळी, विचित्र मन:स्थिती तिनंही ओळखली आणि नेहमीच्या जिव्हाळ्याच्या स्वरात तिनं मला विचारलं, "तुम्हाला बरं नाही का?"
 तिनं असं विचारावं याचं मला आश्चर्य वाटलं नाही. तथापि माझ्या जीवनात ती डोकावू पाहत असल्याची मला जाणीव झाली. आजवरचा परकेपणा तिच्या दृष्टीनं संपवून टाकल्याचं मला जाणवलं. तिला काही तरी कडवट उत्तर देऊन हा परकेपणाचा पडदा तसाच घट्ट पकडून ठेवावा असं तीव्रतेनं मला वाटलं.
 पण मग माझं मलाच वाटू लागलं, आता एखादा माझा मित्र आला असता तर त्याच्याशी मी माझं मन मोकळं केलं नसतं का? मग बिचाऱ्या सुमित्रा गोखलेनंच आपलं असं काय घोडं मारलं आहे की, आपण सदानकदा तिच्याशी इतक्या तुटकपणे वागावं? ज्या माझ्या मित्रांशी मी माझं मन मोकळं करतो तेही माझे एकाएकी मित्र बनले नव्हते. कालांतराने त्यांच्यात आणि माझ्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. एक प्रकारचा विश्वास वाटू लागला होता. सुमित्रा गोखलेच्या इतक्या परिचयानंतर आता तिच्याविषयी इतका विश्वास निर्माण व्हायला काय हरकत होती?
 बाहेर शून्यपणे पाहत मी म्हणालो, "आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केलेली एक मुलगी मी पाहिली-गळफासाला लटकलेली."
 बराच वेळ ती काही बोलली नाही. नुसती माझ्याकडे पाहत राहिली. मग मीच पुढं म्हणालो, "तिचं एका तरुणावर प्रेम होतं."
 "मग? मग झालं काय?" तिनं अस्वस्थपणं विचारलं.
 "कुणास ठाऊक! तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. कदाचित दुसऱ्याच कुणा मुलीशी त्यानं जमवलं असेल. तिला बिचारीला फसवलं असेल!"
 "त्याला तिच्या प्रेमाची कल्पना होती का?"

 तिचा हा प्रश्न मला पोरकट वाटला. मी उत्तरलो, “असेल किंवा नसेल. मला त्याची कल्पना नाही. तिचं त्याच्यावर प्रेम होतं इतकंच मला माहीत आहे. बाकीचे माझे तर्क आहेत.

९४ । लाट