पान:लाट.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लाट


 एक दिवस एका साहित्यविषयक समारंभात माझी आणि सुमित्रा गोखलेची अकस्मात ओळख झाली. समारंभ संपल्यावर ज्या अनेक लोकांनी अहमहमिकेने माझी ओळख करून घेतली, त्यात सुमित्रा गोखले ही एक होती. निवडक लोकांच्या घोळक्यात बसलेलीच तोपर्यंत मी तिला पाहत होतो. तिच्या हातातल्या चारदोन मासिकांच्या अंकांनी माझं कुतूहल चाळवलं होतं. इतर वक्त्यांची भाषणं न ऐकता ती एका मासिकात डोकं खुपसून बसली होती. मधूनच पुढं येणाऱ्या केसांच्या बटा आपल्या हातांनी मागं सारीत होती. वाचता वाचता थबकून, मनगटातले बिल्वर उगाचच कोपरांपर्यंत मायं सारीत होती. आणि व्यासपीठावरून तिचे हे आविर्भाव मी निर्विकारपणे पाहत होतो.
 पण मग मी बोलायला उठताच झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटानं भानावर येऊन तिनं हातातलं मासिक मिटलं. माझं भाषण संपेपर्यंत एकाग्रतेनं ती माझ्याकडे पाहत राहिली. समारंभ संपताच मी तिथून बाहेर पडल्यावर हसत हसत ती समोर आली आणि नि:संकोचपणे तिनं माझी ओळख करून घेतली. माझ्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहाची भरमसाट स्तुती करण्यास तिने आरंभ केला. असल्या औपचारिक बोलण्याला सरावलेला मी नुसता हसलो! बोलता बोलता माझ्याशी साहित्यावर खूपशी चर्चा करण्याची आपली इच्छा तिने माझ्यापाशी व्यक्त केली. माझा पत्ता मागून घेतला. मी घरी कधी असतो ते विचारून घेतले आणि निरोप घेऊन हसत हसत ती निघून गेली.

 यानंतर सुमित्रा गोखले नेहमी माझ्या घरी येऊन माझ्याशी बोलत बसू लागली. लेखकाशी वैयक्तिक ओळख असणारा वाचक ज्या आपुलकीनं, आदरानं लेखकाविषयी, त्याच्या साहित्याविषयी बोलत असतो, त्या आदरानं सुमित्रा गोखले माझ्याशी रोज येऊन बोलू लागली. माझ्याशी साहित्याचा वाद ती उकरून काढू लागली. साहित्याखेरीज इतर विषय तिला वर्ज्य नव्हते. संगीताचं चांगल्यापैकी ज्ञान तिनं संपादन केलं होतं. नवकलेच्या उन्मेषावरील तिचे विचार एखाद्या अव्वल दर्जाच्या नवकलाकारानं व्यक्त करावेत अशा अभिरुचीचे होते. रागदारीवर बोलताना मधूनच तिला गायची लहर येई आणि ती गाऊनही दाखवी. अशा वेळी नि:स्तब्धपणे मी ते ऐकत असे आणि क्वचित वेळी तिची प्रशंसाही करीत असे. आणि नवकलेतलं काहीच कळत नसल्यामुळे त्यावर बोलायचं शक्य तितकं

९२