पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडवल्यामुळे रोजगार हमीचं काम मुकादमास बंद करावं लागलं होतं. त्यामुळे आई दुपारीच घरी आली. तेव्हा काळ्या-निळ्या अवस्थेत बेहोशीच्या स्थितीत मीना वेदनेनं तळमळत खाटेवर पडलेली तिनं पाहिली. खाटेखाली एक औषधाची उघडी रिकामी बाटली पडलेली व त्यातून दोन दिवसापूर्वी बाजारातून जर्सी गाईच्या आजारपणासाठी आणलेलं औषध सांडलेलं. आईला काय घडलं असेल हे क्षणार्धात लक्षात आलं. पोरगी मरणार की काय, या भीतीनं तिनं टाहो फोडला. मग स्वत: सावरत शेजारच्या चार पाच लोकांना बोलावून मीनाला जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तातडीनं उपाय करून तिच्या शरीरातलं विष काढलं व तिचा प्राण वाचवला.
 त्या जालीम विषानं मीनाच्या शरीराची आग आग होत होती, पण एक बेहोशीचा अथांग सागर अवघ्या जाणिवेवर पसरलेला. त्या जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरील मनोवस्थेत बंद डोळ्यासमोर आणि अद्यापही पूर्ण विस्मरण न झालेल्या मनमानसाच्या पटलावर अनेक दृश्यं फेर धरून नाचत होती.
 शाळेत दररोज वा-याच्या वेगानं पळत जाऊन पिरिअड गाठताना घामेजलेल्या चेह-यावरची जिंकल्याची सिंकदर भावना ...
 कुठलंही काम सांगितलं की, जास्तीत जास्त वेगानं पळत जाऊन करण. अभ्यासासाठी आई मागं लागली की, तिच्या हातचा मार चुकविण्यासाठी सुसाट धावणं.
 आणि त्या पारध्याचा पंधरा-वीस किलोमीटर केलेला पाठलाग.
 मीनाच्या चेह-यावर किंचितसं हसू फुलून आलं होतं. क्षणभर तिला आपल्या वेदनांचा विसर पडला होता. तो पोलीस इन्स्पेक्टर आश्चर्यानं पाहात होता काही बोध होत नसल्यामुळे बुचकाळ्यात पडलेला. पण सॉयकॉलॉजी जाणणा-या डॉक्टराना वाटलं, कोणत्यातरी आनंददायी आठवणीनं मीनाचा चेहरा नक्कीच फुलून आलाय. त्या आठवणी नक्कीच तिच्या रनिंगच्या खेळाशी संबंधित असणार.
 मीनाच्या आठवणींचा कोलाज अर्धवट बेहोशीच्या स्थितीतही चालू होता. ज्या वेगानं ती नेहमी पळायची, त्याच्या कितीतरी अधिक पटीनं मनानं आठवणीच्या दृश्यांची फिल्म उलगडली जात होती.
 खरं तर तिच्या दप्तरात, तेही शाळेत जाताना काय असणार? पण ती बॅग नवा चकचकीत होती. जिल्हास्तरीय हौशी अॅथलेटिक्स स्पर्धेत १५०० मी. धावण्याच्या ठार्यतीत प्रथमच तिनं भाग घेतला होता आणि त्यात ती सर्वप्रथम आली होती. प्रायोजकानं तिला ही बँग भेट दिली होती.

 मीनासाठी ती अनमोल होती. अठरा विश्वे घरात असलेले दारिद्र्य आणि राज दोन वेळा धड पोटभर खाण्याची असलेली भ्रांत. अशाही परिस्थितीत मीना खेळाडू

९६ ॥ लक्षदीप