पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरकून गेला... कसं होणार रमावहिनीचं?
 आत झोपडीतून सतत विव्हळण्याचा स्वर येत होता. प्रज्ञाची वहिनी रमा अडली होती. कालपासून वेणा सुरू होत्या; पण अजून मोकळी झाली नव्हती. खरं तर प्रज्ञानं भीमदादाला अनेकवार म्हटलं होतं, जवळच जवळा बाजार आहे. तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रमाला डिलिव्हरीसाठी दाखल करावं म्हणून. पण तिथं जाण्यासाठी सध्या एस. टी. नव्हती. कारण मधल्या पुलाचे काम चालू होतं म्हणून बंद पडलेली एस. टी. सुरू झाली नव्हती. त्यामुळे न्यायचं कसं हा प्रश्न होता.
 तांड्यावर कुणाकडेही बैलगाडी नव्हती व गावात मागूनही बैलगाडी मिळणं शक्य नव्हतं. हे माहीत असूनही प्रज्ञानं भीमदादाला गावात जाऊन पाहण्यास सांगितलं. तसा तो अनिच्छेनंच गेला होता. अनेक शेतक-यांना भेटला होता. त्यांना एक दिवस बैलगाडी देण्यासाठी विनवलं होतं. पण छे! त्याला निराश होऊन परतावं लागलं होतं. गाव सोडलं तरी अढी व छुपा बहिष्कार कायम होताच.
 प्रज्ञाला काळजीत पडलेलं पाहून रमावहिनीनं स्वत:हून आपल्या कळा कशाबशा सहन करीत म्हटलं होतं, “तुमी कायसुदिक इचार करू नका ननंदबाई... इतं आपल्या तांड्यावर सोजर मावशी हाय की सुईण, तिला तेवढं बोलवा म्हंजे झालं. म्या नीट बाळंत व्हते. काही गरज नाही दवाखान्यात जाण्याची!”
 प्रज्ञाला ते पटलं नव्हतं, पण काही इलाजही नव्हता. “ठीक आहे. पण दादा, आज तू कामावर जाऊ नकोस."
 "नाही प्रज्ञा, आज पगारवाटप आहे. एक महिन्यापासून जे. ई. साहेब नसल्यामुळे वाटप झालं नाही. मला गेलंच पाहिजे. कारण पैसा नाही तर घर कसं चालणार?” असे म्हणून तो कामाला निघून गेला होता.
 सोजरमावशी रमा वहिनीजवळच बसून होती. तिच्या ओटीपोटाला मालिश करीत होती, वेणा काढीत होती व प्रज्ञाला धीर देत होती.
 पण अठरा - वीस घंटे झाले तरी सुटका होत नव्हती. त्यामुळे प्रज्ञाचा जीव करवादला होता.
 त्यातच मघाशी सोजरमावशीनं सांगितलं होतं, की दोन बादल्या पाणी पाहिजे म्हणून... कडक गर्मीचा रमाला त्रास होत होता. सारं अंग तापलं होतं. तिचं अंग थड पाण्यानं सतत पुसणं भाग होतं. झालंच तर बाळंतपणानंतर स्वच्छतेसाठी व बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करण्यासाठी पण पाणी हवं होतं.

 मोठ्या मुश्किलीनं साठवलेलं अर्धा बादली पाणी मघाशी संपन गेलं होतं. प्रज्ञानं तांड्यावरील दोन - चार घरातून तांब्या - तांब्या पाणी जमा करून कसंबसं आणखी अर्धी बादली पाणी जमा केलं होतं. पण रमावहिनीचं अंग तापानं तप्त झाले होते. तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवणं व अंग पुसून घेणं आवश्यक होत.

८८ ॥ लक्षदीप