पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हती. पुन्हा आज रस्ता नसतानाही टॅकर येत होताच, म्हणून त्याची तीव्रता जाणवत नव्हती.
 तांड्याचे नेते किसन रणबावळेनी तिची पाठ थोपटीत म्हटलं होतं, “बाबानू, ही पोर म्हंतेय ते समदं खरं हाय. ह्यो रस्ता व्हायलाच हवा. गावातले मजूर नाय येणार या कामाला... त्यांचा बहिष्कार हाय... नाही!”
 "पण दादा, लय जिकरीचं काम हाय. अन् बंडिंगच्या कामावर मजुरीबी जादा मिलते..." एक म्हणाला.
 “आनी हे रस्त्याचे काम थोडंच पळून जातं? बंडिगचं काम झाल्यानंतर करू की..." दुस-यानं म्हटलं. आणि सान्यांनी मग “हो हो, ह्ये बेस हाय." असं म्हणत दुजोरा दिला व तो विषय तिथंच संपला. प्रज्ञा मात्र हताशपणे त्यांच्याकडे पाहात राहिली.
 किसन रणबावळे मग तिची समजूत काढीत म्हणाले होते. “ए, जाऊ दे पोरी, तू नगं इतका इचार करू.... इथं आल्यापासून मात्तर तू निस्ती निकामी हायंस... या तांड्यावर मॅट्रिक शिकलेली एकमेव पोर तू.. भीम्याच्या सौंसारात खस्ता खातीस. मह्या मनात हाय, इथं एक बालवाडी सुरू करावी. तू इथल्या लहान पोरास्नी शिकवू शकशील...!"
 प्रज्ञाचे डोळे आशेनं लकाकले. ती म्हणाली, “दादा, खरंच असं होईल? गावात असताना माझी बालवाडी नीट चालायची. इथं मात्र जिल्हा परिषदेची गॅट हवी. कारण इथं फी कोण देणार?"
 "व्हय पोरी, म्या सभापतीशी बोललूया परवाच. ते म्हणाले, जरूर परयत्न करू!"
 तिच्या आई बापाचा विरोध असतानाही भीमदादाच्या प्रोत्साहनानं ती मॅट्रिकपर्यंत शिकली. एवढंच नव्हे, तर चांगल्या दुस-या श्रेणीत पास झाली होती. तिनं मग बालवाडीचा सर्टिफिकेट कोर्स करून गावातच समाजमंदिरात बालवाडी सुरू केली होती. ती चांगली चालत असतानाच बहिष्काराचं प्रकरण उद्भवलं.

 त्यावर्षी गावात दुष्काळामुळे पाणीटंचाई होती. अजून रँकर सुरू व्हायचा होता. गावात एक खाजगी विहीर होती जुन्या मालीपाटलाच्या मालकीची. तिला भरपूर पाणी होतं. त्यावर सारं गाव पाणी प्यायचं, पण नवबौद्ध व इतर दलितांना पाणी स्वत:हून घ्यायला पाटलाची मनाई होती. त्यांचे दोन नोकर प्रत्येक घराला एक घागर पाणी शेदन द्यायचे. हे सुशिक्षित प्रज्ञाला खटकलं होतं, पण ती चूप होती. मात्र काही दलित लोकांना त्यांची चीड आली होती. एका सभेसाठी पँथरचे काही नेते औरंगाबाद नांदेडहन आले होते. जेव्हा हा प्रकार त्यांना समजला, तेव्हा त्यांनी जाहीर सभेत मालीपाटलाचा निषेध केला व दुस-या दिवशी वृत्तपत्रात मोठी बातमी छापून आली.

८६ ॥ लक्षदीप